Wed, Jul 24, 2019 12:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मितेश जगताप आत्महत्या : पोलीस अडचणीत

मितेश जगताप आत्महत्या : पोलीस अडचणीत

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 10 2017 12:58AM

बुकमार्क करा

कल्याण : वार्ताहर 

मित्राला भेटून घराकडे परतणारा इंजिनियर तरुण मितेश जगताप याला टिटवाळा पोलिसांनी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी इतका छळ केला की त्याने या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबीयांनी मितेशने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला इतका त्रास दिला की त्यांना टिटवाळा येथील राहते घर सोडून डोंबिवलीत राहण्यास जावे लागले. दोषी आरोपींवर कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय पुढार्‍यांचे उंबरठे झिजवले मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत टिटवाळा पोलिसांना 4 आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर त्यांच्या वकिलाने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, अशी मागणी न्यायालयात केली आहे. यामुळे मितेशच्या मृत्यूस जबाबदार पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना शिक्षा होईल, असा विश्वास जगताप कुटुंबाने व्यक्‍त केला आहे.

टिटवाळा मांडा येथे राहणारे राजेश जगताप यांचा मोठा मुलगा मितेश हा इंजिनियर होता. 21 ऑगस्ट रोजी रात्री काही मित्रांना भेटून तो आपल्या गाडीने घरी परतत होता. दरम्यान पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांनी त्याला हटकले व त्याला टिटवाळा पोलीस स्थानकात घेऊन गेले. मितेशच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मितेशला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. दोन दिवस पोलिसांनी मितेश आणि त्याच्या कुटुंबाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पोलीस मितेशला एका दरोड्याचा गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होते, यामुळे मितेश मानसिक तणावात होता, त्यातूनच त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपवली.