Fri, Apr 26, 2019 10:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेपत्ता एसीपी चाफेकर इटारसीत

बेपत्ता एसीपी चाफेकर इटारसीत

Published On: Apr 09 2018 1:50AM | Last Updated: Apr 09 2018 1:31AMनवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्‍त राजकुमार चाफेकर शुक्रवारी संध्याकाळी कार्यालयीन कामकाज संपवून गेल्यानंतर घरी परतलेच नाहीत. दोन दिवसांपासून कुटुंबाने शोध घेतल्यानंतर शनिवारी बेपत्ता झाल्याची तक्रार एनआरआय पोलीस ठाण्यात नोंदवली. रविवारी पहाटे इटारसी स्टेशन मास्तरांनी फोन करून ते मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वेस्थानकात असल्याची माहिती दिली, अशी माहिती पोलीस उपायुक्‍त गुन्हे तुषार दोषी यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

नवी मुंबईतील सहायक पोलीस आयुक्‍त अचानक बेपत्ता झाल्याने पोलीस खात्यामध्ये खळबळ उडाली होती. चालू आठवड्यात एससीपी चाफेकर नियमित पोलीस आयुक्‍तालयातील गुन्हे विभागाच्या कार्यालयात कर्तव्यावर होते. त्यांच्याकडे आर्थिक गुन्हे विभाग देण्यात आला आहे. या आधी ते रायगड जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक पदावर माणगावला होते. त्यानंतर त्यांची बदली नवी मुंबईत झाली. एसीपी न्हावाशेवा विभागाचा पदभार सांभाळला होता. त्याचवेळी दोन दिवस त्यांनी पनवेल एसीपी सुट्टीवर गेल्याने सहायक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे प्रकरणाचा तपास केला होता. कळंबोली पोलीस ठाण्यात त्यांनी अभय कुरुंदकरसह इतर दोघांची चौकशी केली होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या शाखा क्रमांक (एक) ने सिडकोच्या भूखंडप्रकरणी बोगस कागदपत्रे तयार करून भूखंड गिळंकृत करणार्‍या शिवसेनेच्या पदाधिकार्‍याला अटक केली होती.चाफेकर रविवारी पहाटे इटारसी रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्तरांकडे गेले होते. त्या ठिकाणावरून  चाफेकरांनी संर्पक साधल्याचे सांगितले. चाफेकर आल्यानंतरच अधिक माहिती मिळू शकेल, आता काही बोलणे उचित ठरणार नसल्याचे दोषी यांनी स्पष्ट केले.

Tags : mumbai, mumbai news, Missing ACP, Chaphekar,  Itarsi,