Thu, Apr 25, 2019 13:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिरा- भाईंदर आयुक्तालय रखडणार

मिरा- भाईंदर आयुक्तालय रखडणार

Published On: Apr 22 2018 8:08AM | Last Updated: Apr 22 2018 1:39AMमुंबई :  चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर, मिरा- भाईंदर व अकोला येथील पोलीस  आयुक्तालयांचा प्रस्ताव वेटिंगवर आहे. पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्तालय झाले असले तरी निधीची उपलब्धता व त्या आधारे पोलीसभरती झाल्याशिवाय ही पोलीस आयुक्तालये करणे शक्य नसल्याचे गृह खात्याच्या सुत्रांनी सांगितले.

पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्तालय प्रत्यक्षात आणताना पोलीस भरती ज्या प्रमाणात पाहिजे तेवढी ती नव्हती. मात्र लगतच्या  परिसरातून पोलिसांची कुमक घेऊन हे पोलीस आयुक्तालय तयार करण्यात आले. गेल्या काही दिवसांत या भागातील गुन्हेगारी वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर  गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी हे पोलीस आयुक्तालय तातडीने करण्याची गरज समोर आल्यानंतर त्याला गती देण्यात आली. 

या  आयुक्तालयाबरोबरच कोल्हापूर, मिरा - भाईंदर व अकोला येथेही पोलीस आयुक्तालये स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर आहे. याठिकाणच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उपाययोजनांमध्ये या तिन्ही ठिकाणी पोलीस आयुक्तालये  स्थापन करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने विधानसभेत या विषयांवर वेळोवेळी झालेल्या चर्चेला  उत्तर देताना स्पष्ट केले होते. 

मात्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यासाठी किमान तीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या असणे अपेक्षित आहे. आयुक्तालयासाठी ज्या प्रकारची रचना अपेक्षित असते त्यासाठी  तेवढे मनुष्यबळ असले पाहिजे तसा आकृतीबंध तयार केला आहे. त्याचबरोबर या संपूर्ण यंत्रणेला पुरतील अशी वाहने व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असते. त्यामुळे  मागणीच्या तुलनेत निधीची उपलब्धता झाल्याशिवाय कोल्हापूर, मिरा -भाईंदर व अकोला ही सरकारने जाहीर केलेली पोलीस आयुक्तालये स्थापन करणे सध्या तरी शक्य नसल्याचे समजते. निधी मिळाल्याशिवाय पोलीसभरती होणार नाही व आयुक्तालयासाठी व्यवस्था उपलब्ध करून देता येणार नाही.

Tags : Mumbai,  Mira Bhaindar Commissionerate, Waiting, Mumbai news,