Tue, Mar 19, 2019 09:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › औरंगाबादेत अल्पसंख्याक कौशल्य विद्यापीठ : मुख्यमंत्री

औरंगाबादेत अल्पसंख्याक कौशल्य विद्यापीठ : मुख्यमंत्री

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 13 2018 12:51AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील अल्पसंख्याक समुदायांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राज्य सरकारकडून राबविण्यात येत आहेत. बदलत्या काळात अल्पसंख्याक तरुणांना उद्योजकतेच्या व्यापक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद येथे अल्पसंख्याक समुदायासाठी कौशल्य प्रशिक्षण विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अल्पसंख्यांक समाजातील तरुणांच्या विविध समस्यांबाबत जमियत उलेमा-ए-हिंद, महाराष्ट्र या संघटनेच्या शिष्टमंडळाने शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत त्या लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. 

शिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अल्पसंख्याक समाजातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. औरंगाबाद कौशल्य प्रशिक्षण विद्यापीठ सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून, तो अंतिम टप्प्यात आहे. देशातील पहिले विद्यापीठ राज्यात स्थापन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून अल्पसंख्याक समुदायाच्या विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणासह 605 अभ्यासक्रमांसाठी 50 टक्के शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ दिला जात आहे. अल्पसंख्यक समुदायासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांवरील खर्चात राज्य सरकारने आधीच्या तुलनेत तिप्पट वाढ केली आहे. सरकार अल्पसंख्याक समुदायाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.