Sat, Jul 20, 2019 15:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदिवलीत चौदा वर्षीय विद्यार्थिनीने घेतली टॉवरवरून उडी (Video)

कांदिवलीत चौदा वर्षीय विद्यार्थिनीने घेतली टॉवरवरून उडी (Video)

Published On: Jun 29 2018 3:22PM | Last Updated: Jun 29 2018 5:56PMमुंबई : प्रतिनिधी

कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजमध्ये राहात असलेल्या अवघ्या 14 वर्षीय मुलीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी घडली. तिच्या आत्महत्येचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. या मुलीने आत्महत्या का केली याचे गूढ मात्र अद्यापही कायम असून याप्रकरणी समतानगर पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेज परिसरात असलेल्या गारडेनिया इमारतीमध्ये 14 वर्षीय हर्षिका मायावशी ही मुलगी कुटुंबासोबत राहात होती. ती येथील शाळेमध्ये नववी इयत्तेत शिकते. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास शिकवणीला जाते म्हणून तिने घर सोडले. शिकवणीला न जाता तिने बाजूलाच असलेल्या आर्केड इमारतीचा आठवा मजला गाठला. दुर्घटना घडल्यास बचाव कार्यासाठी (रेस्कू ऑपरेशन) हा मजला मोकळा ठेवण्यात आलेला होता. त्यामुळे खिडक्यांना सुरक्षेसाठी ग्रील बसविण्यात आल्या नव्हत्या.

हर्षिका यातील एका खिडिकीतून खाली सज्जावर उतरली. एक मुलगी सज्जावर उभी असून ती खाली उडी घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसताच स्थानिकांनी तिला तसे न करण्यासाठी समजावण्यास सुरुवात केली. मात्र हर्षिका कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थीती नव्हती. अवघ्या काही क्षणात तिने खाली उडी घेतली. डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या हर्षिकाला स्थानिकांनी तात्काळ जवळच्या श्री साई हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. मात्र सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

घटनेची माहिती मिळताच पोहचलेल्या समतानगर पोलिसांनी घटनेची नोंद करुन हर्षिकाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली असून हर्षिकाच्या मित्र-मैत्रिणींकडेही चौकशी करण्यात येत आहे. तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे तिच्या शाळेतील आणि शिकवणीच्या शिक्षकांकडेही चौकशी सुरू असून तिच्या नातेवाईकांकडेही पोलीस विचारपूस करत असल्याची माहिती मिळते. 

स्थानिकांनी घेतली बघ्याची भूमिका?

हर्षिकाच्या मृत्यूनंतर तिच्या आत्महत्येचा व्हिडीओ शूट करणार्‍या स्थानिकांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिकांनी तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता तर तिचा जीव वाचू शकला असता असेही बोलले जाते. व्हिडीओतील दृश्यानुसार तिने अचानक उडी घेतली नाही. लोक तिला समजावत होते. मात्र काही वेळाने तिने उडी घेतली. तसेच हर्षिका आठव्या मजल्यावर पोहचली आणि तिने आत्महत्या केल्याने इमारतीच्या सुरक्षेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.