Tue, Mar 26, 2019 07:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Published On: Mar 01 2018 1:52AM | Last Updated: Mar 01 2018 1:39AMबदलापूर : वार्ताहर 

बदलापूर येथील गणेशनगर आपटेवाडी भागात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रवींद्र सांजेकर (24) आणि अहमद खान (18, दोघेही रा. शिरगाव) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्यांना कल्याण येथील न्यायालयात हजर केले असता 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारानंतर तीन आरोपींना मोठ्या शिताफीने बदलापूरातूनच अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. 

बदलापूर पूर्व भागात ही अल्पवयीन पीडित मुलगी राहते. तिच्या ओळखीच्याच तीन जणांनी शिरगाव-पनवेल हायवे येथील डोंगरावर तिला नेले आणि आळीपाळीने बलात्कार केला. यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे तर दोन आरोपी हे सज्ञान आहेत. हे तीनही आरोपी पीडितेच्या ओळखीचे असल्याने पोलिसांना या तिघांना अटक करण्यात यश आले. 

घटना घडल्यानंतर पीडित मुलगी ही गेले दोन दिवस बेपत्ता होती. ही घटनेवरुन आपल्याला आई-वडील ओरडतील या भीतीने ती बेपत्ता होती. त्यामुळे पोलीस या प्रकरणी मुलीचा कसून शोध घेत होते. मुलीच्या शोधासाठी विविध पथकेही वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आली होती. मात्र ही पीडित मुलगी घराजवळीलच एका गार्डनमध्ये बसली असल्याची माहिती पोलिसांना बातमीदाराकडून मिळाली. यानुसार पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन पीडितेला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुमार राजभोज करीत आहेत.