Mon, Apr 22, 2019 23:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे मनपा आयुक्तांच्या वाढणार अडचणी

ठाणे मनपा आयुक्तांच्या वाढणार अडचणी

Published On: Mar 06 2018 1:50AM | Last Updated: Mar 06 2018 12:54AMमुंबई : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीच्या वादग्रस्त चित्रफितीमुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अडचणी  वाढल्या आहेत. जस्वाल यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई  करून अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या महिला अधिका-याकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्या, अशी  मागणी  करणार्‍या  याचिकेची न्या. आर.एम. सावंत आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या न्यायालयाने आज गंंभीर दखल घेतली. त्या मुलीचे पोक्सो अंतर्गत जबाब नोदवा, असे आदेश देताना  न्यायालयाने हे जबाब नोंदवण्यासाठी ठाण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा चव्हाण यांची नियुक्‍ती केली आहे.

ठाण्याचे आरटीआय  कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांच्यातर्फे अ‍ॅड. एस. एस. भिसे आणि अ‍ॅड. सागर जोशी यांनी  पालीका आयुक्तांविरोधातील चित्रफितीची  दखल घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. आर.एम. सावंत व न्या.सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली यावेळी अ‍ॅड. एस. एस. भिसे आणि अ‍ॅड. सागर जोशी यांनी चित्रफितीची सिडी न्यायालयात सादर केली. ही चित्रफित समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध झाल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. या चित्रफितीत ती मुलगी आपण  जयस्वाल यांच्या बंगल्यावर कामाला होतो. तेथे ते आपल्याला  वाईट वागणूक देत होत असल्याचे वक्तव्य  करते, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच ही चित्रफित मिळाल्यानंतर याचिकाकर्त्याने माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.त्या वेळी या मुलीला कामावरून काढून टाकल्याचे तसेच टिकूजीनीवाडीतील भवानीनगर येथील झोपडपट्टीतील तिचे झोपडेही पालिकेच्या अधिकार्‍यांनी जमीनदोस्त केल्याचे घरमालकीणीकडून कळल्याचा दावा केला. याची न्यायालयाने गंभीर दखल धेतली. त्या मुलीचा ठाण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा चव्हाण यांनी पोक्सो कायद्यांतर्गत जबाब नोंदवून कारवाई करावी, असे आदेश  देऊन न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी 2 एप्रिलपर्यंत तहकूब ठेवली.