Thu, Nov 15, 2018 23:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छबी सुधारण्यासाठी मंत्र्यांना आता स्वतंत्र पीआरओ

छबी सुधारण्यासाठी मंत्र्यांना आता स्वतंत्र पीआरओ

Published On: Jan 30 2018 2:16AM | Last Updated: Jan 30 2018 1:58AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

निवडणुकांपूर्वी मंत्र्यांची छबी सुधारण्यासाठी प्रत्येक मंत्र्याला आता स्वतंत्र जनसंपर्क अधिकारी दिला जाणार आहे. 30 मंत्र्यांसाठी दरमहा 25 हजार रुपयांच्या पगारावर हे जनसंपर्क अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासंदर्भातील आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. 

सरकारमधील मंत्र्यांवर विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. या आरोपांमुळे सरकारच्या छबीवरही परिणाम होत आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे विरोधक अधिकच आक्रमक होऊ लागले आहेत. अनेक मंत्री विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे सरकारही सावध झाले असून या मंत्र्यांची छबी सुधारण्यासाठी नव्या दमाचे जनसंपर्क अधिकारी देण्यात येणार आहेत. मंत्र्यांवर झालेल्या आरोपांवर तातडीने खुलासा करणे, मंत्री व त्यांच्या खात्याचे निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी 30 मंत्र्यांना जनसंपर्क अधिकारी दिले जाणार आहेत. सध्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून मंत्र्यांना प्रसिध्दीसाठी मनुष्यबळ देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या जोडीला कंत्राटी तत्वावर जनसंपर्क अधिकारी नेमले जाणार आहेत.  या पदाचा कालावधी दोन वर्षे किंवा मंत्रिमंडळाचा कालावधी संपेपर्यंत राहणार आहे. हे जनसंपर्क अधिकारी मंत्री आस्थापनेवर काम करतील.