Mon, Aug 26, 2019 00:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना-भाजपचे नाते म्हणजे ‘‘तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ : नितीन गडकरी

सेना-भाजप म्हणजे ‘तुझं माझं जमेना...’: गडकरी

Published On: May 29 2018 12:37PM | Last Updated: May 29 2018 1:16PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

सत्तेत राहूनही नाराजी व्यक्त करणाऱ्या शिवसेनासोबत भाजपचे वैचारिक मतभेद नसल्याचे खुलासा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजपची हिंदुत्ववादाच्या मुद्यावर युती आहे. ती यापुढेही टिकून राहिली पाहिजे असेही गडकरी म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

शिवसेना आणि भाजपचे नाते हे ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ असे असल्याचेही ते मिश्किलपणे म्हणाले. गडकरींचे हे वक्तव्य म्हणजे आगामी लोकसभा स्वबळावर लढवण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेला गोंजारण्याचाच प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेले शीतयुद्ध पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमुळे चांगलेच भडकले. ऑडिओ क्लिपवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. या प्रकरणामुळे भाजप-शिवसेनेच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

यावर बोलताना गडकरी म्हणाले, शिवसेना भाजपमध्ये वैचारिक मतभेद नाहीत. जे काही वाद निर्माण झाले आहेत त्यात मध्यस्थी करण्यास मला वेळ नाही. मात्र, पक्षश्रेष्ठींनी सांगितले तर मध्यस्थी करेन.  

ऑडिओ क्लिपबद्दल नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू घेत ते नियमबाह्य बोलणाऱ्यांपैकी नाहीत, असे स्पष्ट केले. तर मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेदचा अर्थ सांगावा आम्ही त्यांच्याकडून शिकण्यास तयार आहोत असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. या आव्हानाला उत्तर देत नितीन गडकरी यांनी ‘साम दाम’ चा अर्थ सांगितला. ‘साम-दाम-दंड-भेद म्हणजे पूर्ण ताकदीने लढा’ असे ते म्हणाले. 

पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानावेळी मशिनमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या बिघाडावरही नितीन गडकरी बोलले. EVM मध्ये बिघाड ही गंभीर बाब आहे. याची नोंद निवडणूक आयोगाने घ्यावी, असे ते म्हणाले. देशभर वाढत्या इंधनाच्या दरावरही ते बोलले. इंधन दरवाढ हा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मुद्दा आहे असे गडकरींनी स्पष्ट केले. 

गंगा नदी प्रदुषणाबाबत विचारले असता, गंगा नदी स्वच्छतेवर ‘निर्मल गंगा’ आणि ‘अविरल गंगा’ हे दोन प्रोजेक्ट सुरू आहेत. दिल्लीत ११ प्रोजेक्ट्स पैकी ७ वर काम सुरू आहे. मार्च २०१९ पूर्वी आम्ही ९० टक्के गंगा स्वच्छ करू,असे नितीन गडकरी यांनी सांगितले.