Mon, Apr 22, 2019 04:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हा तर गुरू-शिष्यांचा गौरव

हा तर गुरू-शिष्यांचा गौरव

Published On: Jan 09 2018 2:03AM | Last Updated: Jan 09 2018 1:29AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे या खर्‍या अर्थाने महाराष्ट्राच्या माणिक आहेत. त्यांना प्रदान करण्यात येणारा भारतरत्न पंडित भिमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे, असे गौरव उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काढले.

सांस्कृतिक संचालनालयातर्फे  प्रतिवर्ष भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यंदाचा पुरस्कार पं. अरविंद परिख यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आला. आपल्या भाषणात तावडे म्हणाले की, आकाशवाणीच्या प्रत्येक कार्यक्रमात माणिकताईंचे सुर आम्ही ऐकले आहेत. आज त्यांना गौरविण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे. नजिकच्या काळात शास्त्रीय संगीत व संगीत नाटकांची उच्च परंपरा कशी पुढे नेता येईल, याचा कृती आराखडा बनविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नवीन पिढीमध्ये राष्ट्रीय संगीताची आवड आणि गोडी रुजविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही तावडे यांनी सांगितले.

2019 मध्ये सुधीर फडके, गदिमा व पुल देशपांडे या महान व्यक्तींचे जन्मशताब्दी वर्ष येत आहे, हे जन्मशताब्दी वर्ष नियोजनबद्ध पध्दतीने साजरे करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या जन्मशताब्दी वर्षामध्ये फक्त उत्सव साजरे करायचे नसून, नवीन पिढीमध्ये संगीतकार कवी, गायक, साहित्यिक निर्माण करावयाचे आमचे उद्दीष्ट आहे.

जीवनगौरव पुरस्कार विजेत्या माणिक भिडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या आज आपल्याला मिळालेला पुरस्कार वैयक्तिक नाही तर गुरुंचा आशीर्वाद आहे. संगीत क्षेत्रात गुरु-शिष्याची परंपरा आजही कायम असून माझा गौरव म्हणजे गुरु शिष्य परंपरेचा गौरव आहे. नवी पिढी शास्त्रीय संगीताकडे वळत असून शास्त्रीय संगीतामध्ये संगीतसाधक व्हायचे असेल तर गुरु शिष्य परंपरा जोपासली पाहीजं. आज सोशल मिडीयाच्या जमान्यात संगीताचा गाभा सर्वांना जपायचा आहे. त्याचे भान सर्वांनी राखावे, असे आवाहनही त्यांनी केले.