Fri, Feb 22, 2019 20:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना-भाजप एकत्र लढणार!

शिवसेना-भाजप एकत्र लढणार!

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 15 2018 1:19AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

विरोधकांनी सामना वाचून शिवसेना भाजप निवडणुका वेगळे लढतील असा अंदाज बांधू नये. आमचे सुरुळीत चालले आहे. दोन्ही पक्ष भविष्यातील निवडणुका या सोबतच लढतील आणि पुन्हा सत्तेवर येतील, असे भाकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केले. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर कुरघोडी करीत टोलेबाजी केली. अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी सामनाचा दाखला देत अर्थसंकल्पावर खिशात नाही आणा आणि नुसताच घोषणांचा घाणा, अशी टीका शिवसेनेने केल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, सामनाच्या बातम्यांवर तुम्ही जाऊ नका. येणार्‍या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढू असा तुमचा अंदाज असेल तर तो साफ चुकीचा आहे. दोन्ही पक्ष हे येणार्‍या निवडणुका एकत्रच लढतील. 

गेली निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीनेही स्वतंत्र लढविली होती. हे विसरून तुम्ही आज एकत्र आले आहेत. आम्ही पण तुमच्यापासून काहीतरी शिकलो आहोत. आम्हीपण निवडणुकीत एकत्र येण्याचे ठरविले आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. 

आघाडी सरकारच्या काळात शिवस्मारकाबाबत केवळ आश्‍वासने देण्यात आली. त्यावेळी केंद्राने या प्रकल्पाच्या परवानग्या नाकारल्या होत्या. मात्र, आम्ही सर्व परवानग्या मिळविल्या असून आता कामालाही सुरुवात होणार आहे हे सांगतानाच मागील आघाडी सरकारच्या कामाची गती ही कासवाला आत्महत्या करायला लावेल, अशी होती, असा टोला त्यांनी लगावला.