होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणार प्रकल्प लादणार नाही...

नाणार प्रकल्प लादणार नाही...

Published On: Mar 08 2018 1:48AM | Last Updated: Mar 08 2018 1:00AMमुंबई : प्रतिनिधी

कोकणात होऊ घातलेल्या राजापूर तालुक्यातील नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्पाला स्थानिक जनतेकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारचा असल्याने मुख्यमंत्रीच त्यासंदर्भात निर्णय घेतील. हा प्रकल्प शासनाकडून कोणत्याही परिस्थितीत लादला जाणार नाही. एकवेळ मंत्रीपद सोडेन, पण या प्रकल्पाविरोधात जनतेच्या पाठीशी उभा राहीन अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. 

नाणार प्रकल्पालामुळे कोकणातील बागायतींचे नुकसान होणार असून पर्यावरणावरही याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे काही गावांतून या प्रकल्पाला विरोध होत असतानादेखील भूमीसंपादन करून प्रकल्पाचे काम रेटले जात असल्याचा प्रश्‍न काँग्रेस सदस्या हुस्नबानु खलिफे यांनी उपस्थितीत करत त्यास स्थगिती देण्याची मागणी केली. भाई जगताप यांनी प्रकल्पाबाबत सरकारमध्येच दोन मते असल्याचे सांगत नेमकी भूमिका स्पष्ट करण्यात यावी, अशी मागणी केली. 

राजापुर तालुक्यातील 8 आणि देवगड तालुक्यातील 2 अशा एकूण दहा गांवातील लोकांना प्रकल्पाला विरोध केला आहे. त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींनीही प्रकल्पाच्या विरोधात ठराव करून शासनाकडे सादर केले आहेत. 18 मे 2017 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील 14 गावांतील जमिनींना  32-2 च्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांना 5738 शेतकर्‍यांनी हरकती घेतल्या आहेत. देवगड तालुक्यात 997 शेतकर्‍यांनी हरकती घेतल्या आहेत. त्यावर सुनावण्याही घेण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता हा प्रकल्प लादला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

स्थानिक जनतेकडून होणारा विरोध आणि त्यासंदर्भात प्राप्त झालेली निवेदने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भावना कळविण्यात आल्या आहेत. त्यावर हा प्रकल्प रद्द करावा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी कुणी जोरजबरदस्ती करत असेल तर ते खपवून घेतली जाणार नाही. कुणा सदस्यांकडे तशी माहिती असेल तर अवश्य सांगा, त्यावर कारवाई केली  जाईल, असे देसाई यांनी सांगितले.