Tue, May 21, 2019 12:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणापर्यंत नोकरभरती थांबवा!

मराठा आरक्षणापर्यंत नोकरभरती थांबवा!

Published On: Jul 27 2018 1:48AM | Last Updated: Jul 27 2018 1:29AMमुंबई : राज्यातील  मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारने नोकरभरती थांबवावी, अशी मागणी शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये शिवसेनेचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा समाजाने आतापर्यंत  57 मोर्चे काढले होते. अतिशय शांततापुर्ण मार्गाने काढलेल्या या मोर्चांची जगाने दखल घेतली पण शासनाकडून मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आता  मराठा समाजाचा सरकारवर विश्‍वास राहिलेला नाही. नाईलाजाने समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाज आता अतिशय आक्रमक झाला असून त्याचा संयम सुटत चाललेला आहे. आरक्षणाबाबत सरकारने त्वरित पावले उचलली नाहीत तर  या ठिणगीचे वणव्यात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण हा राज्यातील सर्वात ज्वलंत प्रश्‍न असल्यामुळे या प्रश्‍नावर सरकारने मुंबईत विशेष अधिवेशन बोलवून एकमताने आरक्षणाचा ठराव मंजूर करावा. तसेच सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार पदांच्या नोकरभरतीबाबत आपल्याकडे निवदेने आली आहेत. त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही नोकरभरती करण्यात येवू नये, अशी मागणी  कदम यांनी केली आहे.