मुंबई : विशेष प्रतिनिधी
नेहरू आणि गांधी परिवाराच्या 48 वषार्ंच्या राजवटीत जेवढे काम झाले नसेल तेवढे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने गेल्या 48 महिन्यात करून दाखविल्याचा दावा, केंद्रीय रस्ते वहातूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. राज्याचे सध्या 18 टक्के असलेले सिंचन केंद्र सरकारने केलेल्या मदतीमुळे 2019 पर्यंत 40 टक्क्यांवर जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने विविध क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती दिली. ते म्हणाले, नेहरू, गांधी घराण्याच्या 48 वर्षाच्या कारभाराची आणि मोदी सरकारच्या 48 महिन्यांतील कामगिरीची जनतेने तुलना करावी. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या या 48 महिन्यात मोठे आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडून आले आहे. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला आहे. मोफत गॅस कनेक्शन, जनधन योजना, कौशल्य विकास, बेघरांना घरे, मुद्रा लोन, शौचालय बांधणी, रस्ते विकास, रेल्वे आदी क्षेत्रात सरकारकडून वेगाने काम झाले आहे. त्यातून राज्याला मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वत्र नाराजी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी हे पेट्रोलियम पदार्थ जीएसटीत आणणे हा एक पर्याय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तशी मागणी केली असून त्यावर जीएसटी कौन्सिलमध्ये निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात केवळ 18 टक्के सिंचन क्षेत्र आहे. परंतु, राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला 80 हजार कोटींची मदत केली आहे. त्यामुळे डिसेंबर 2019 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होऊन राज्याची सिंचन क्षमता ही दुप्पट होईल.
मुंबईत बीपीटीच्या जागेवर 1 हजार एकरवर मनोरंजन पार्क बांधण्यात येणार आहे. शिवाय मुंबईतून मुंबई — गोवा क्रूझ सेवा, रोरो सेवा सुरू करण्यात येईल. त्यासाठी भाऊचा धक्का व मांडवा आदी ठिकाणी जेटी बांधण्यात आल्या आहेत.
एकूण 60 जेटी बांधून जलवाहतूकही सुरू करण्यात येणार असून ठाणे — विरार दरम्यानही जलवाहतूक करण्यासाठी 1200 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.
याशिवाय मुंबई — दिल्ली एक्स्प्रेस हायवे बांधण्यासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यामुळे हे अंतर सव्वाशे किलो मीटरने कमी होणार आहे. 12 तासातच मुंबईहून दिल्लीला पोहोचता येईल, असे गडकरी म्हणाले.