Sun, Jan 20, 2019 06:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकार आम्ही आहोत; तुम्ही नव्हे: गडकरी

सरकार आम्ही आहोत; तुम्ही नव्हे: गडकरी

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 12 2018 9:53AM

बुकमार्क करा
मुंबई : खास प्रतिनिधी

संरक्षण मंत्रालय वा नौदल नव्हे, तर आम्ही सरकार आहोत, त्यामुळे विकासकामांना हरकती घेण्याचे थांबवा, अशा शब्दांत मुंबईतील विकासकामे आणि नवीन प्रकल्पांना सुरक्षेच्या कारणामुळे आक्षेप घेणार्‍या नौदल अधिकार्‍यांना केंद्रीय रस्तेवाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी चांगलेच झापले.

देशाच्या सीमावर्ती भागात आवश्यकता असताना मुंबईतच नौदलाचा तळ केवळ अधिकार्‍यांना असलेल्या मुंबईच्या आकर्षणामुळेच ठेवण्यात आल्याची गंभीर टीका गडकरी यांनी वरिष्ठ नौदल अधिकार्‍यांसमोरच केली. मलबार हिललगतच्या समुद्रात होणार्‍या तरंगत्या हॉटेलसाठीच्या जेटीला नौदलाने आक्षेप घेतल्यामुळे संतापलेल्या गडकरी यांनी नौदलासह अनेक सरकारी खात्यांची मानसिकताच नकारात्मक झाल्याचे उद्गार काढले. मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या भूमिपूजनानंतर ते बोलत होते. 

मुंबईतील अनेक विकासकामे नौदलाने हरकत घेतल्याने खोळंबली आहेत. त्यामुळे संतापलेल्या गडकरी यांनी नौदलाच्या पश्‍चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांच्या उपस्थितीतच सुनावले. मुंबईपेक्षा नौदलाने  पाकिस्तानच्या सीमेलगत गस्त घालावी, केवळ निवडक वरिष्ठ अधिकार्‍यांनी मुंबईत राहावे, दक्षिण मुंबईतच  नौदलाच्या इतक्या वसाहती आणि बंगले कशासाठी? असा सवाल करत आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहेच, पण तुम्ही सीमावर्ती भागात गस्त घालण्यासाठी जावे, असा सल्ला केंद्रीय मंत्र्यांनी दिला.  

अरबी समुद्र किनारा ही मुंबईची सर्वात मोठी ताकद असूनही आतापर्यंत त्याचा योग्य वापर होऊ शकला नाही. राज्याच्या विकासाला मोठी गती देऊ शकेल अशा क्रूझ पर्यटनाकडे लाल फितीच्या कारभारामुळे मोठे दुर्लक्ष झाले होते. पण आता त्यातील अडथळे दूर करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.