Tue, Jul 23, 2019 12:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रास्त दर न दिल्यास दूध संकलन अमूलकडे

रास्त दर न दिल्यास दूध संकलन अमूलकडे

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 1:26AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे सहकारी व खासगी दूध संघांनी शेतकर्‍यांना रास्त दर न दिल्यास  दूध संकलनाचे काम अमूलला दिले जाईल, असा इशारा पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिला आहे. तसेच शेतीमाल आणि दुधाला रास्त भाव देण्याच्या मागणीसाठी संपकरी शेतकरी दूध रस्त्यावर फेकत असल्यामुळे होणार्‍या नासाडीबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नेत्यांच्या नादाला लागून शेतकर्‍यांनी दूध फेकण्याऐवजी गरीबांना द्यावे, असे भावनिक आवाहन जानकर यांनी केले आहे.

शेतकरी संघर्ष समितीतर्फे दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात येत आहे. आपण आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार असून शेतकरी नेत्यांनी चर्चेला यावे, असे ते म्हणाले. दूध दराच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने दूध भुकटी तयार करणार्‍या सहकारी, खासगी दूध संघांना प्रति लिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून त्यापोटी सुमारे 32 कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडला असल्याची माहिती जानकर यांनी दिली.

राज्यात 21 खासगी आणि 7 सहकारी दूध संघ आहेत. त्यापैकी 20 संघ दरमहा 10 हजार मेट्रिक टन भुकटी तयार करतात. भुकटीचे दर कमी झाल्यामुळे दूध खरेदी करून त्यापासून भुकटी बनवण्यासाठी संघांना प्रति लिटर दुधाला 3 रुपये 24 पैसे इतका तोटा होतो. त्यामुळे भुकटी बनवताना लागणार्‍या दुधासाठी प्रति लिटर 3 रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.