Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्री-आमदार तुपाशी, चालक-रक्षक उपाशी

मंत्री-आमदार तुपाशी, चालक-रक्षक उपाशी

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 13 2018 1:29AMमुंबई : खास प्रतिनीधी

विधानभवनात सर्वत्र चमचमीत पदार्थांचा दरवळ सुटलेला असताना आणि मंत्री आमदारांना आग्रहाने जेव-खाऊ घालत असताना विधानभवनाच्या आवारात मात्र या आमदार-मंत्र्यांचे वाहन चालक आणि अंगरक्षक मात्र उन्हाच्या कडाक्यात घामाघूम होत भुकेने व्याकूळ झालेले पहायला मिळत आहेत. साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय या लोकांसाठी नाही. 

विधानभवनाच्या आवारात मंत्री आणि आमदारांच्या मोटारींच्या पार्किंगची सोय आहे. तेथे दोन मंडप घालण्यात आले आहेत. या मंडपात हे अंगरक्षक आणि चालक दिवसभर बसून किंवा झोपून असतात. दिवसभर आपला बॉस विधानभवनातल्या थंडगार हवेत असताना त्यांच्या रक्षणाची जबाबदारी असलेले अंगरक्षक आणि वाहन चालक मात्र रणरणत्या उन्हात असतात. त्यांच्यासाठी साधी पिन्याच्या पाण्याचीदेखील सोय करण्यात आलेली नाही. आधी विधानभवनाच्या कँटिनमधून आलेले किंवा बाहेरून आणलेले जेवण एका स्टॉलवर या लोकांसाठी ठेवले जात असे. हे जेवण विकत घेऊन का होईना पण खायची सोय होती. आता सुरक्षेच्या नावाखाली ते बंद करण्यात आल्याने  विधानभवनाच्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस आणि वाहनचालक व अंगरक्षक यांचे प्रचंड हाल होत आहेत. चहा घ्याला देखील बाहेर जावे लागते. जेवायला मनोरा आमदारनिवासाच्या उपाहारगृहात जावे लागते. तशात बॉसचा फोन आला तर हातातले जेवण बाजूला ठेवून धावतपळत परत यावे लागते. 

विधानभवनाचा परिसर हा अध्यक्ष आणि सभापतीच्या अधिपत्याखाली असतो. त्यांनीच आता या लोकांची दखल घेतली तर काहीतरी होऊ शकते. नाहीतर उन्हाच्या झळा खात सुरक्षारक्षक आणि वाहनचालक यांना अधिवेशन कधी संपणार याची वाट पहात बसावे लागणार आहे. एरवी राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी काम करीत असल्याचा दावा करणारे आमदार-मंत्री आपल्याच कर्मचार्‍यांबद्दल इतके उदासिन का? असा सवाल विचारला जात आहे.