Mon, Jun 17, 2019 02:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यातील रिक्षाचालक शाखाप्रमुख ते शिवसेना नेते

ठाण्यातील रिक्षाचालक शाखाप्रमुख ते शिवसेना नेते

Published On: Jan 24 2018 1:53AM | Last Updated: Jan 24 2018 1:53AMठाणे : प्रतिनिधी

दिवंगत आनंद दिघे यांच्याप्रमाणे मनातील निर्णयाचा कुणालाही थांगपत्ता लागू न देता त्याची पक्ष हित, सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अंमलबजावणी करणारे शिवसेना नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या राजकीय कारर्किदीत पराजय हा शब्द कधीच माहिती नाही. रिक्षाचालक शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, जिल्हाप्रमुख, कॅबिनेट मंत्री ते शिवसेना नेता अशी त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे.

वाचा : आदित्य, एकनाथ शिंदे, गीते, खैरेंची नेतेपदी वर्णी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या शब्दाखातर वाटेल ते करण्याची तयारी ठेवणार्‍या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1980 च्या दशकात शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. रिक्षा चालवून उदर्निवाह करणारे शिंदे किसननगरचे शाखाप्रमुख बनले. शाखाप्रमुख असतानाच्या पाच वर्षात त्यांनी दिघे यांच्या शब्दावर अनेक आंदोलने चेतवली. 

वाचा : ब्लॉगः पडद्यामागचे मिलिंद नार्वेकर अखेर पडद्यावर! 

साखरेचा प्रचंड तुटवडा असताना दिघे यांनी त्यांच्यावर  कारखान्यात जाऊन साखर आणण्याची जबाबदारी सोपवली होती. प्रचंड धोकादायक परिस्थितीत ट्रक घेऊन गेलेले शिंदे यांनी चालकाच्या वर असलेल्या लाकडी खणात पैसे ठेवले होते. कारखान्यात पोहचेपर्यंत ते सारखे पैसे आहेत की नाहीत पाहत असत. अखेर त्यांनी साखर ठाण्यात आणली आणि वाटली. 

गरिबीचे चटके सहन एकनाथ शिंदे यांनी सोसले आहेत. वागळे इस्टेटमधील मच्छिच्या कंपनीत सुपर व्हायझर म्हणून काही काळ काम केले. त्यानंतर ते किसननगमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांची दोन मुले धरणात बुडल्यानंतर खचून गेलेल्या शिंदे यांना सावरले ते दिघे यांनीच. सभागृहनेतेपदाची जबाबदारी देत दिघे यांनी शिंदे यांना सेनेच्या अधिक व्यापात अडकवले. 2001 ते 2005 अशी प्रदीर्घ कारकिर्द गाजविणार्‍या शिंदे यांनी आपल्या कामाची छाप सोडली. आमदार मो.दा. जोशी यांच्या निधनांतर शिंदे यांना ठाणे विधानसभेची उमेदवारी मिळाली. अतिशय शांत, सयमी आणि पटकन प्रतिक्रिया न देणार्‍या शिंदे यांच्या या स्वभावामुळे त्यांनी विरोधी पक्षालाही आपलेसे केले. त्यांचे हे कौशल्य पाहून सेनाप्रमुखांनी त्यांच्यावर ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली.

वाचा : लोकसभा, विधानसभा स्वबळावर : उद्धव ठाकरे 

संघटन कौशल्य पणाला लावून त्यांनी ठाणे, कल्याण-डोंबिववली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका जिंकत जिल्ह्यातील शिवसेना भगवा आदिवासी भागापर्यंत फडकविला. जिल्हाप्रमुख या नात्याने शिंदे यांनी आनंद दिघे यांची निर्माण झालेली पोकळी भरून काढली. ठाणे महापालिकेवर एकहाती सत्ता आणि ठाणे जिल्हा परिषदेवर सेनेचा भगवा फडकवणे स्वप्नवत वाटत असताना त्यांनी किमया करून दाखवली आणि त्यांची दखल मातोश्रीपासून सह्याद्रीपर्यंत मुख्यमंत्र्यांनाही घ्यावी लागली. 

कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली. सर्व सामान्यांपासून आमदारांपर्यंतची कामे करणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता, मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. म्हणूनच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर सोपविली आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेना नेतेपदी बढती देऊन त्यांच्या संघटन कौशल्यावर शिक्कामोर्तब केले. कोणत्याही राजकीय कारकिर्दीत यापेक्षा समृद्धी आणखी काय असू शकते?