होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील उपसा सिंचन योजना आणणार सोलरवर

राज्यातील उपसा सिंचन योजना आणणार सोलरवर

Published On: Jan 19 2018 2:10AM | Last Updated: Jan 19 2018 1:46AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणण्यासाठी धोरण तसेच मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर घेण्यासाठी महानिर्मिती व जलसंपदा तसेच महाऊर्जा या तीनही विभागांच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे यावेळी उपस्थित होते. उपसा सिंचन योजनेजवळील जागा सोलरसाठी वापरणे, पडित किंवा खडकाळ जागेचाही शोध घेणे, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्यासंदर्भात अभ्यास करणे व येत्या 15 दिवसात वरील विषयांवर अभ्यास करून धोरण तयार करून एका समितीचे गठन करण्याच्या सूचना बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. 

विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे संचालक सुर्वे हे या समितीच्या अध्यक्षपदी राहतील. सदस्य म्हणून महानिर्मितीचे संचालक विकास जयदेव, महावितरणचे सतीश चव्हाण, महापारेषण संचालक गणपत मुंडे व महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पुरूषोत्तम जाधव यांचा समावेश राहील. ही समिती 30 दिवसात आपला अहवाल सादर करील.

महानिर्मितीच्या अधिकार्‍यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बैठका घेऊन जागांचा शोध घ्यावा. शासकीय जागा, गावठाणच्या जागा, सिंचन तलावाजवळील जागा, शेतकर्‍यांच्या पडित जमिनी, खडकाळ जमिनींचा शोध घेऊन प्रकल्पासाठी जागा मिळवावी. 

महाउर्जाकडील जमिनीचा डाटा घेऊन जागा मिळव्यावात. महाऊर्जाकडे आहे. याशिवाय महानिर्मितीच्या अनेक प्रकल्पांजवळ जागा आहेत. त्या जागांही या योजनेसाठी घेता येतील. तसेच एमआयडीसीमध्ये तालुका स्तरावर जागा रिकाम्या आहेत. त्या जागाही या प्रकल्पासाठी घेणे शक्य आहे. कोणत्याही स्थितीत 500 मेगावॉटचा प्रकल्प डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करून सुरू होणे आवश्यक आहे.

या प्रकल्पाची माहिती आणि जागेसाठी तालुका स्तरावर मेळावे आयोजित करा. जागेच्या मागणीची  घोषणा करा. यासाठी महाऊर्जाच्या विभागीय कार्यालयांची मदत घ्या. महाऊर्जा व महानिर्मितीच्या अधिकार्‍यांची दर आठवडयात बैठक घेण्याचे निर्देश बावनकुळे यांनी या बैठकीत दिले.