Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमेरिकेसारखे रस्ते करूनही माध्यमांचे दुर्लक्ष

अमेरिकेसारखे रस्ते करूनही माध्यमांचे दुर्लक्ष

Published On: Mar 08 2018 1:48AM | Last Updated: Mar 08 2018 1:19AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मुंबईला कोकणाशी जोडणारा सायन-पनवेल हा मुख्य रस्ता अमेरिकेतील रस्त्यासारखा केला आहे. अमेरिकेसारखे रस्ते तयार करूनही माध्यमांनी त्याकडे दुर्लक्षच केल्याची खंत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

नियम 293 अन्वये विरोधी पक्षाकडून उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील बोलत होते.    सरकारने रस्त्यांसाठी निधी असला तरी हा निम्मा निधी डांबरासाठी वापरा आणि काही निधी माध्यमांना मॅनेज करण्यासाठी वापरा, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत केल्याची बातमी आपल्या वाचनात आली असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी त्यावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करण्याची मागणी केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आपण बैठकीत अशा कोणत्याही सूचना दिल्या नाहीत, असे स्पष्ट केले. 

चांगले रस्ते केले तर त्याला प्रसिध्दी द्या, एवढेच मी म्हणालो होतो. सांगली महापालिका निवडणुकीवेळी घरोघरी जाऊन मतदारांना भेटवस्तू द्या, असे आपण म्हणालो नव्हतो.  आपण जनसंपर्कावर भर द्यावा. त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांना भेटा ऐवढेच कार्यकर्त्यांना सांगितले होते, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, येत्या दोन वर्षांत राज्यातील 10 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते हे हायब्रीड-अ‍ॅन्युइटीने बांधले जातील. या रस्त्यांसाठी वार्षिक देखभाल-दुरुस्ती करार करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यांवर पुढील 10 वर्षे कोणतेही खड्डे पडणार नाहीत. 

बांधकाम विभागाने गेल्या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत 56 हजार किमी मार्गावरील खड्डे भरले आहेत. सरकारने राज्यातील 22 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले आहेत. या महामार्गाला केंद्राकडून 1 लाख 6 हजार कोटींचा निधी मिळणार असून आतापर्यंत 20 हजार कोटी रुपये मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.