Mon, Jun 24, 2019 17:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समर्थ रामदासांचे कार्य अनमोल : ना. अनंत गीते

समर्थ रामदासांचे कार्य अनमोल : ना. अनंत गीते

Published On: Feb 09 2018 7:37PM | Last Updated: Feb 09 2018 7:37PMमहाड : प्रतिनिधी

महाराष्ट्रात असलेल्या मोगली सत्ताधीशांसमोर 350 वर्षापूर्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मराठी समाजाला स्वदेश व स्वधर्माची शिकवण देऊन हिंदवी स्वराज्यासाठी प्रेरित करणाऱ्या समर्थ रामदास स्वामी यांचे कार्य अनमोल आहे. असे उद्गार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना. अनंत गीते यांनी व्यक्‍त केले. सुंदर मठ रामदास पठार येथे समर्थ रामदास स्वामींच्या 336 व्या पुण्यतिथी सोहळ्यात ते बोलत होते. 

श्री गणेशनाथ महाराज संस्थानच्या वतीने महाड तालुक्यातील सुंदर मठ रामदास पठार येथे 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत दास नवमी निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन तसेच सामुदायिक पारायण व अखंड नाम यज्ञाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी समर्थ रामदास स्वामींच्या 336 व्या पुण्यतिथीचे आयोन केले होते. यावेळी एकनाथ महाराजांचे वंशज ह.भ.प. श्री प्रविण महाराज गोसावी, रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख रवि मुंडे व महाड पोलादपूर संपर्क प्रमुख सुभाष पवार, स्वामी अरविंदनाथ महाराज, महाड तहसीलदार चंद्रसेन पवार, सा.बां. विभाग उपअभियंता संजय पाटील, राजिप सदस्य मनोज काळीजकर, माजी राजिप सदस्य मुरलीधर दरेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. 

आपल्या अर्ध्या तासाच्या भक्तीपूर्ण मार्गदर्शनामध्ये ना. गीते यांनी माराराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेचा आढावा घेऊन एवढी मोठी परंपरा देशातील कोणत्याही राज्याला नसल्याचे नमूद केले. संतांनी दिलेल्या ग्रंथांमधून दाखविलेल्या मार्गावर तसेच त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. महाड पोलादपूर तालुका हा कोकणातील अध्यात्मिक परंपरा असलेला असून, या तालुक्यातून विविध संप्रदाय समाजसेवेची कामे करीत आहेत. आपल्या 6 विजयामध्ये या दोन तालुक्यांचा वाटा मोलाचे असल्याचे स्पष्ट करून, सर्व सांप्रदायाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असल्याचे गीते म्‍हणाले. गेल्या 25 वर्षाच्या या संबंधांमुळे निर्माण झालेले कौटुंबिक नाते आगामी काळातही असेच सुरु राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

गीते म्‍हणाले, ‘‘समर्थ रामदास स्वामींनी 350 वर्षापूर्वी इंदवी स्वराज्य निर्मिती साठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेले कार्य अनमोल आहे.  धर्मकारण व समाज कारण एकत्र आल्यास हिंदुस्थान समोर आव्हान देण्याची जगात कोणाची हिम्मत होणार नाही. समाजाला योग्य मार्ग दाखविण्याचे काम अध्यात्माच्या माध्यमातून या थोर संतांनी केले व आपला समाज सुखी समाधानी राहावा यासाठी आपले आयुष्य व्यतीत केले.’’

तत्पूर्वी एकनाथ महाराजांचे वशंज ह. भ.प. श्री प्रविण महाराज गोसावी यांनी जीव व देवामध्ये संतांचे चरण धरल्यास व दास म्हणून काम केल्यास मालक होता येईल असे विचार व्यक्त केले. समर्थांनी चेतविलेल्या वन्ही -ज्योत पुढे नेण्यासाठी तरुणांनी कार्यसिध्द व्हावे असे आवाहन करून सर्व संप्रदायांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा स्वामी अरविंदनाथ महाराजांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त  केले. 

यावेळी जिल्हा प्रमुख रवी मुंडे व महाड पोलादपूर संपर्क प्रमुख सुभाष पवार यांची समयोचित भाषणे झाली. आपल्या प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमाचे संयोजक स्वामी अरविंदनाथ महाराज यांनी समर्थांच्या कार्याचा आढावा घेतांना देहाच्या गावापासून देवाच्या गावी जाई पर्यंत सदैव देशाची व समाजाची चिंता करणारे या देशातील संत परंपरेमध्ये समर्थ रामदास स्वामींसारखा संत जगाच्या पाठीवर आढळणार नसल्याचे मत व्यक्त केले. आपली विशाल परंपरा असलेला इतिहास जपला नाही तर भुगोलाला अर्थ राहणार नाही असे सांगतांना कोकण हा भारतातील स्वर्ग असून शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या ना. अनंत गीते यांचे कार्य अत्यंत समाज उपयोगी असल्याचे मत व्यक्त केले. या ठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येण्याचे आवाहन करून या भागातील सुरु असलेल्या संत परंपरेच्या कार्याचा मागोवा घेतला.