Tue, Mar 26, 2019 21:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कंपन्यांत गाड्या लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा

कंपन्यांत गाड्या लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 12:58AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

नवीन गाडी कंपनीला लावण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भातील तक्रारीवरून पोलीस या भामट्याच्या मागावर असतानाच त्रस्त तरुणाने शक्कल लढवून सोशल मीडियाच्या साह्याने या भामट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रोहित गायकवाड (वाकोला, मुंबई) असे या भामट्याचे नाव आहे. या भामट्याने या आधीही अनेकांना फसवल्याची शक्यता आहे. 

कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात राहणारा हरप्रित कपूर हा आपली गाडी एखाद्या कंपनीत लावून उत्पन्न मिळवण्याच्या विचारात होता. यासाठी त्याने विविध वेबसाईटवर संपर्क साधून माहिती घेतली. याच दरम्यान एका वेबसाईटच्या माध्यमातून त्याची रोहितशी ओळख झाली. रोहितने हरप्रितला बँकेचे कर्ज करून गाडी घेऊन देतो. ही गाडी कंपनी किंवा हॉटेलमध्ये लावून तुला महिन्याचे चांगले उत्पन्न मिळवून देतो, असे आमिष दाखविले.

सुरुवातीला हरप्रितने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रोहितने वारंवार हरप्रितशी संपर्क साधण्याचे काम सुरूच ठेवले. अखेर हरप्रित या आमिशला बळी पडला. त्याने ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यात रोहितला सुमारे 1 लाख 8 हजार रुपये दिले. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही गाडीबाबत काहीच हालचाल न दिसल्याने हरप्रितला संशय आला. त्याने याबाबत रोहितशी संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने म. फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.