Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कार्ड क्‍लोनिंगद्वारा कोट्यवधींची फसवणूक करणारी टोळी गजाआड

कार्ड क्‍लोनिंगद्वारा कोट्यवधींची फसवणूक करणारी टोळी गजाआड

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी

कार्ड क्‍लोनिंगद्वारे ग्राहकांच्या डेबीट आणि क्रेडिटचा डाटा चोरी करुन बोगस कार्डवरुन कोट्यवधी रुपयांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा खेरवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील मुख्य आरोपींसह पाच आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. अक्रम मेहबूबअली शेख, फैज करमहुसैन चौधरी, अल्ताफ आफ्ताब शेख, सरफराज समसुद्दीन शेख आणि राहुल देवनारायण यादव अशी या पाचजणांची नावे आहेत. 

आरोपींकडून पोलिसांनी सात पोर्टेबल मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड रिडर, एका डाटा रिडर, रायटर मशिन, दोन लॅपटॉप, विविध बँकेचे 35 हून अधिक बोगस डेबीट आणि क्रेडिट कार्ड तसेच काही क्‍लोन केलेले एटीएम कार्ड जप्त केले आहेत. 

तपासात ही टोळी कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि कपड्याच्या दुकानात कामाला असलेल्या कर्मचार्‍यांना हाताशी धरुन तिथे येणार्‍या ग्राहकांचे क्रेडिट आणि डेबीट कार्ड पोर्टेबल मॅग्नेटिक स्ट्रिप रिडरच्या मदतीने डाटा चोरी करीत होते. हा डाटा मुख्य आरोपींना देऊन नंतर बोगस कार्ड बनवून विविध एटीएम सेंटरमधून पैसे काढले जात होते. त्यासाठी या कर्मचार्‍यांना प्रत्येक डाटामागे एक ते दोन हजार रुपयांचे कमिशन मिळत होते. यातील अक्रम शेख आणि फैज चौधरी हे टोळीतील मुख्य सूत्रधार आहेत. 

अल्ताफ शेख हा एका हॉटेलचा मॅनेजर म्हणून काम करीत होता तर सर्फराज शेख आणि राहुल शेख हे सध्या एका हॉटेलमध्ये कामाला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. अटकेनंतर या सर्वांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कार्ड क्‍लोनिंगद्वारे बोगस कार्डच्या मदतीने या टोळीने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणुक करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.