Fri, Jul 19, 2019 05:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाड्यात लाकडाच्या वखारीत सापडले लाखोंचे घबाड

वाड्यात लाकडाच्या वखारीत सापडले लाखोंचे घबाड

Published On: Aug 15 2018 11:59PM | Last Updated: Aug 15 2018 11:22PMवाडा : वार्ताहर

वाडा वनविभागातील पश्चिम विभागाच्या हद्दीत असलेल्या दास्तान डेपोवर (लाकडाची वखार) केलेल्या कारवाईत विना परवाना लपवून ठेवलेला साग, खैर व अन्य प्रजातीच्या जवळपास 1012 घनमीटर लाकडाचा माल जप्त करण्यात वनविभागाला यश आले आहे. यातील तीन आरोपींना अटकही करण्यात आली आहे. सुनील आंबवणे यांच्या मालकीची ही वखार आहे. जप्त केलेल्या संपूर्ण लाकडांची बाजारभावात 30-40 लाखाहून अधिक किंमत असून याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

वाडा-मनोर या महामार्गावर ठाणगेपाडा येथे असलेल्या दास्तान डेपोत विना परवाना लाकडाचा मोठा साठा असल्याची माहिती वन अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हे डेपो 20 जुलै रोजी सील केले व पुढील तपास सुरू केला. या तपासात या डेपोमध्ये साग, खैर व इतर प्रजातींची झाडे विनापरवाना तोडून त्याचा साठा केल्याचे उघड झाले. त्यानुसार सोमवारी (दि. 13) या डेपोवर वन अधिकर्‍यांनी धाड टाकून साग, खैर व इतर प्रजाती असा एकूण 1012 घनमीटर विनापरवाना माल जप्त केला. 

या प्रकरणी डेपोचे मालक सुनील आंबवणे (रा. वाडा) यांच्यासह एजंट व यात सहभागी असलेले राजु शिलोत्री (रा. पोशेरी) व रमेश पाटील (रा. पालसई) या तिघांवर गुन्हे दाखल केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता वाडा न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. याबाबत पुढील तपास वनविभाग करीत आहे. दरम्यान वाडा वनविभागाच्या पूर्व व पश्चिम परिक्षेत्र कार्यालयापासून काहीच अंतरावर असलेल्या या डेपोवर विनापरवाना इतका माल राजरोस पडलेला असतांना वन विभागाच्या इतक्या यंत्रणा झोपा काढतात का? असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

वाडा शहरात लाकडाचे एकूण 8 डेपो असून त्यांवर देखरेख करणारे वाडा बीटचे वनपाल विष्णु मुळमुळे यांच्यावर या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांनी दिली. दरम्यान,  परिक्षेत्र अधिकारी सापळे यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावून यावर उत्तर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच या सर्व प्रकारात असलेला माल हा खासगी क्षेत्रातील होता की वन विभागाच्या हद्दीतील आहे, याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती जव्हार उपवनसरक्षक मिश्रा यांनी दै. पुढारीला दिली.

जव्हार वनविभागात तीन वर्षांपूर्वी शिवबाला हे धडाडीचे उप वनसंरक्षक आल्याने मालकी व वन विभागाच्या क्षेत्रात होणारे गोरखधंदे बर्‍यापैकी बंद झाले होते. काळेधंदे व बेजबाबदारपणे वागताना अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांचा थरकाप व्हायचा. अशीच शिस्त व वचक नव्याने आलेले अधिकारी मिश्रा यांनीही आपल्या प्रशासनावर ठेवावा जेणेकरून जंगल सहीसलामत राहील, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.