होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घरांसाठी गिरणी कामगारांचा आक्रोश मोर्चा

घरांसाठी गिरणी कामगारांचा आक्रोश मोर्चा

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी 

सरकारने लवकरच गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी न लावल्यास संतप्त गिरणी कामगार येत्या 19 नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनात  विधान भवनला घेराव घालून आंदोलन करतील, असा इशारा गिरणी कामगारांनी मंगळवरी आझाद मैदानावरील आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाद्वारे दिला. 

गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घराच्या प्रश्नावर रयतराज कामगार संघटना, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, गिरणी कामगार संघर्ष समिती आणि सेंच्युरी मिल कामगार एकता मंच या पाच कामगार संघटना एकत्र येत मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढला. मंगळवारी मुंबईत अधूनमधून पावसाच्या धारा बरसत होत्या, मात्र त्याची पर्वा न करता मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील हजारो कामगारांनी हजेरी लावून सरकारद्वारे रखडलेल्या प्रश्नावर संताप व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी  आमंत्रण दिल्याप्रमाणे मंत्रालयात गृहनिर्माण खात्याचे अप्पर सचिव संजीवकुमार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. येत्या गणपती पूर्वी सर्व संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावून गिरणीकामगार घराच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचेही आश्‍वासन अप्पर सचिव संजीव कुमार यांनी शिष्टमंडळाला दिलेे. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. त्यापूर्वी आझाद मैदानावरील मोर्चात राज्य सरकारच्या कामगार आयुक्तालयाच्या उपआयुक्त शिरीन लोखंडे यांनी मोर्चा पुढे बोलताना संगितले की, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या आंदोलनाची दखल घेतली असून, त्यांनी या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याची तयारी दर्शवली आहे.