Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईची उद्यापासून दूधकोंडी !

मुंबईची उद्यापासून दूधकोंडी !

Published On: Jul 15 2018 1:55AM | Last Updated: Jul 15 2018 1:55AMपुणे/कोल्हापूर : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 जुलैपासून दूध बंद आंदोलन पुकारले असून सोमवारपासून मुंबईची चारही बाजूंनी दूधकोंडी अटळ आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत मुंबईलाही दूध न पाठवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने या आंदोलनामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होऊ शकतात.  

राज्य सरकार दूध उत्पादक शेतकर्‍यांना लिटरला पाच रुपयांचे अनुदान जोपर्यंत जाहीर करीत नाही, तोपर्यंत मुंबईची चारही बाजूंनी दूधकोंडी निश्‍चित केली आहे. शेतकरी दुधाचे संकलनच करणार नाहीत, असेच आमचे आंदोलन आहे. आमचे लक्ष्य मुंबई असले तरी मोठ्या शहरांनाही त्याची झळ बसणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

राज्य सरकारने गाईच्या दुधाचा खरेदी दर लिटरला 27 रुपये निश्‍चित केला. मात्र, सध्या 16 ते 18 रुपये प्रति लिटरने दुधाची खरेदी होत आहे. त्यामुळे सरकारच्या दरानुसारच दुधाची खरेदी व्हावी, कर्नाटक सरकार शेतकर्‍यांना लिटरला पाच रुपयांचे अनुदान देते. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही तेवढे अनुदान द्यावे, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून दूध आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार शेट्टी यांनी आंदोलनाच्या तयारीची माहिती दिली.

कर्नाटकातील सीमावर्ती भागातील शेतकरी नेत्यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला आहे. वसई-विरार पट्ट्यातही गुजरातमधील दूध आम्ही येऊ देणार नसून सर्वच ठिकाणांहून दूध आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.

गोकुळचाही पाठिंबा

दरम्यान शेतकर्‍यांना पाठिंबा म्हणून 17 जुलैपासून दूध संकलन व दुधाची वाहतूकही करण्यात येणार असल्याचे गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी सांगितले. गोकुळ च्या संचालकांची बैठक संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात झाल्यानंतर ते बोलत होते.  शासनाने दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रूपये अनुदान देण्याची मागणी सर्वप्रथम गोकुळ ने केली होती. त्याच मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला गोकुळचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

हार्दिक पटेल यांचाही पाठिंबा

पटेल आंदोलनातील नेता हार्दिक पटेल यांनीही या दूध आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. गुजरातमधील दूध नेऊन आमच्याच महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे आंदोलन मोडणार असतील तर आम्ही मुंबईला जाणारे दूध अडवू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

 आंदोलनाचे स्वरूप पाहता मुंबईकरांचे चहा, कॉफीचेही वांदे होऊ शकतात. 
 मुंबईची दररोजची सरासरी 70 लाख लिटर इतक्या दुधाची गरज आहे. त्यातील बहुतांशी दूध पुरवठा हा गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यांतून होतो. 
 गुजरातचे अमूल दूध महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडून दूध संकलनकर्ते व मुंबईत ते विकते. शेतकरी दूधच घालणार नसल्याने अमूलचा पर्यायदेखील मुंबईकरांसमोर नसेल.
 गुजरातसह नाशिक पट्टा, अहमदनगर, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणारे दुधाचा एक थेंबही मुंबईला पोहोचणार नाही, अशा पद्धतीने आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे.