Thu, Jul 18, 2019 00:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दूधभेसळ केल्यास 3 वर्षे कारावास!

दूधभेसळ केल्यास 3 वर्षे कारावास!

Published On: Mar 14 2018 1:39AM | Last Updated: Mar 14 2018 1:38AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील भेसळयुक्त दुधाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने फौजदारी कायद्यात बदल करण्यास परवानगी दिली असून त्यानुसार कायद्यात बदल करण्यात येईल. त्यासाठी विधी व न्याय विभागाकडून मार्गदर्शन घेतले जात आहे. सध्या भेसळीसाठी सहा 

महिन्यांपर्यंत असलेली शिक्षा वाढवून ती किमान तीन वर्षे ते जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंत करण्याचा विचार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

राज्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याप्रकरणी विधानसभा सदस्य अमित साटम, मनिषा चौधरी तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना बापट यांनी दूध भेसळीसंदर्भातील कायदा अधिक कडक करणार असल्याचेस्पष्ट केले. ते म्हणाले, भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी फौजदारी संहिता कलम 272 ते 276 मध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला शिक्षेमध्ये बदल करण्यास परवानगी दिली आहे. दूधभेसळसंदर्भात तपासणी करणार्‍या राज्यात केवळ चार मोबाईल व्हॅन असून सदर तपासणी नियमितपणे होत नसल्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले. संबंधित यंत्रणेला दुधाची तपासणी नियमितपणे करण्याच्या सूचना दिल्या जातील. याशिवाय मुंबईत येणार्‍या तसेच राज्याच्या इतर भागातील जास्तीत जास्त दुधाची मोबाईल व्हॅनकडून तपासणी केली जाईल, असेही बापट म्हणाले. मुंबईत येणार्‍या 30 टक्के दुधात भेसळ असते, असा दावा भाजपचे अमित साटम यांनी केला होता. कर्मचारी वर्ग व मोबाईल व्हॅनच्या कमतरतेमुळे सरप्राईज तपासणी करणेही शक्य होत नाही. यामुळे दूध, औषधे व हॉटेलमधील अन्नपदार्थ यांच्यातील भेसळ तपासणीसाठी सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. कायद्यात पळवाट काढून गुन्हेगार सुटतात. या पळवाटाही बंद करण्यात येतील. दुधाबरोबरच खाद्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. यावेळी चर्चेत आ. बाळासाहेब थोरात, सुभाष साबणे, राहुल कूल, अतुल भातखळकर आदींनी सहभाग घेतला.