मोतीलाल नगर येथे म्हाडाचा पहिला एसआरए

Published On: Sep 23 2019 2:04AM | Last Updated: Sep 23 2019 1:59AM
Responsive image


मुंबई : प्रतिनिधी

गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगरमधील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)कडून हाती घेतलेल्या पुनर्विकासात मुंबईतील पहिल्यांदा एसआरए प्रकल्प साकारण्यात येणार आहे. म्हाडाच्या मालकीच्या जागेवर 2 हजार झोपड्या आहेत. या झोपड्यांचा पुनर्विकास म्हाडा स्वत: करणार असून, याव्यतिरिक्त दोन ते अडीच हजाराची विक्रीच्या (सेलेबल) सदनिका म्हाडाला हाऊसिंग स्टॉक म्हणून उपलब्ध होणार आहे.

मोतीलाल नगरमधील म्हाडाच्या मालकीच्या इमारती-चाळी म्हाडाच्या जागेवर काही झोपड्याही आहेत. विकास आराखड्यानुसार कलम 33(5) अंतर्गत इमारतींचा विकास होणार असून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, मोतीलाल नगरातील रहिवाशांना जास्तीत जास्त चटईक्षेत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय कलम 33(10) अंतर्गत ज्याची जमीन त्याचा अधिकार पहिला या नात्याने विकास केला जाणार आहे. यासाठी मोतीलाल नगरमधील झोपडपट्टीवासीयांनी एकत्रित येत को- ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करणे बंधनकारक आहे. म्हाडाकडे जमिनीची मालकी असल्याने, मालकी अधिकाराने ही झोपडपट्टी विकसित केली जाणार आहे. 

परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी इथे अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे. झोपडपट्टीधारकांना 300 चौ. फुटांचे घर दिले जाईल. या 2 हजार झोपड्यांव्यतिरिक्त म्हाडाला अतिरिक्त हाऊसिंग स्टॉक मिळणार असल्याचे म्हाडा मुंबईचे सभापती मधू चव्हाण यांनी सांगितले. खासगी विकासकांना झोपडपट्टी विकसित करण्यास मनाई केली जाईल, आवश्यकता वाटल्यास विशेषाधिकार वापरत, विकासकाला मोतीलाल नगरमधील झोपडपट्टी विकासित करण्यात मनाईही केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

मोतीलाल नगरच्या सर्वेक्षणाला वेग

मोतीलाल नगरमधील म्हाडाकडून हाती घेण्यात येणार्‍या पुनर्विकासातून तब्बल 40 हजार घरांचा प्रचंड साठा मुंबईकरांच्या हाती येणार आहे. त्याव्यतिरिक्त आणखी दोन ते अडीच हजार घरे एसआरएतून म्हाडाला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील घरांच्या वाढीव किमतीत घट होतानाच गृहसाठ्यांची कमतरताही भरून निघण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हाडाने यापूर्वी मोतीलाल नगरमधील विस्तीर्ण 142 एकर भूखंडावर पुनर्विकासातून मिनी शहर वसविण्याची योजना जाहीर केली आहे. त्याचाच भाग म्हणून प्रोजेक्ट सल्लागार समितीकडून (पीएमसी) या भागात सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्याचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेतला जात आहे. दास कन्स्टलंटतर्फे सहा पथके हे काम करत असून येत्या काही दिवसांत स्थलांतर सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल. या सर्वेक्षणानंतर बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू होईल. विशेष बाब म्हणजे स्थानिक रहिवाशांचे अन्यत्र स्थलांतर न करता, मोतीलाल नगरमधील संक्रमण शिबिरांतच घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोतीलाल नगरमध्ये म्हाडाच्या वतीने होर्डिंग्ज लावून, कोणत्या सोयीसुविधा म्हाडा उपलब्ध करून देणार आहे याची माहिती लोकांपर्यंत पोहचविली जाणार असल्याचेही मधू चव्हाण यांनी सांगितले.