Mon, Mar 25, 2019 03:07
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साडेसात हजार घरांची सोडत याच महिन्यात

साडेसात हजार घरांची सोडत याच महिन्यात

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:48AMमुंबई : प्रतिनिधी 

म्हाडा कोकण मंडळाच्या माध्यमातून जुलै महिन्यात सुमारे साडेसात हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत म्हाडाची 3 हजार 300 घरे आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 4 हजार घरांचा समावेश करण्यात येणार आहे. 

म्हाडाच्या मुंबईतील घरांना जसा प्रतिसाद मिळतो, तसाच काहीसा प्रतिसाद म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांनाही मिळतो. यामुळे या दोन्ही सोडत वेगवेगळ्या काढण्यात येतात. यंदाही म्हाडाच्या मुंबई मंडळाची आणि कोकण विभागाची सोडत वेगवेगळी काढण्यात येणार आहे. 

कोकण मंडळाच्या माध्यमातून काढण्यात येणार्‍या साडेतीन हजार घरांपैकी 3 हजार 300 घरे ही अल्प उत्पन्न गटातील असणार आहेत. या घरांच्या किमती 25 लाख रुपयांच्या आसपास असणार आहेत, तर पंतप्रधान आवास योजनेतील 4 हजार घरे संपूर्णत: अत्यल्प उत्पन्न गटातील असून सर्वसामान्यांना परवडतील अशा किमती ठरवण्यात येणार असल्याचे कोकण मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्या अर्जदारांना अर्ज भरायचे असतील त्यांनी यापूर्वी शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये नोंद करणे आवश्यक असल्याचे लहाने यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांचे शासनाच्या पीएमएवाय पोर्टलवर रजिस्ट्रेशन आहे त्यांनाच पीएमएवायअंतर्गत घरांचे अर्ज दाखल करता येणार आहेत. या घरांसाठी अर्जदारांनी भारतात आपले कुठेही घर नाही, याचे हमीपत्र देणे बंधनकारक असून अशा अर्जदारांना अनुदानही मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.