होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रोच्या कामाला ब्रेक !

मेट्रोच्या कामाला ब्रेक !

Published On: May 03 2018 1:53AM | Last Updated: May 03 2018 1:49AMमुंबई : प्रतिनिधी 

केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगी शिवाय मेट्रो 2 बी चे कोणतेही बांधकाम करू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी एमएमआरडीएला दिले. मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडींची समस्या गंभीर झाल्याने एच वेस्ट वॉर्ड सिटिझन ट्रस्टच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने एमएमआरडीएला हे निर्देश दिले आणि याचिकेची पुढील सुनावणी 12 जूनपर्यंत तहकूब ठेवली .

वाढत्या वाहतूक कोंडीमुळे एच वेस्ट वॉर्ड सिटिझन ट्रस्टच्या वतीने याचिका दाखल करून या मेट्रोचे काम भुयारी करा अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी एमएमआरडीए प्रशासनाला यासदर्भात एका आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.  

बुधवारी झालेल्या सुनाावणीच्यावेळी एमएमआरडीए प्रशासनाने मेट्रोचे काम भुयारी करण्यास असमर्थता दर्शविली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने मेट्रो 2 बीचे काम केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगी शिवाय सुरू असल्याचा आरोप केला. हा आरोप फेटाळण्यात आला. तसेच अद्याप काम सुरू झालेले नाही. केवळ माती परीक्षण सुरू असल्याचा दावा एमएमआरडीए प्रशासने केला. याची दखल घेत केवळ माती परीक्षणाचे काम करा कोणतेही बांधकाम करू नका असे निर्देश देताना असलेल्या कामाचा अहवाल 9 जूनला न्यायालयात सादर करा, असे न्यायालयाने बजावून याचिकेची सुनावणी 12 जूनपर्यंत तहकूब ठेवली.