Sun, Jul 21, 2019 02:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो सेवा तब्बल सहा तास विस्कळीत

मेट्रो सेवा तब्बल सहा तास विस्कळीत

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:20AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

घाटकोपर ते वर्सोवा या दरम्यान धावणार्‍या मेट्रो-1 मार्गालाही महाराष्ट्र बंदचा फटका बसला आहे. आंदोलकांच्या मेट्रोमार्गिकेवरील घाटकोपर स्थानकातील आंदोलनानंतर घाटकोपर ते एअरपोर्ट रोड या मार्गावरील मेट्रो तब्बल सहा तासांसाठी बंद करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव घाटकोपर ते एअरपोर्ट रोडपर्यंत आपली सेवा बंद केली असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमओपीएल) स्पष्ट करण्यात आले.

बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी घाटकोपर येथून सुटणारी मेट्रो स्थानकातच 15 मिनिटे रोखून धरत निषेध व्यक्त केला. यानंतर आंदोलक असल्फा मेट्रो स्टेशनवरही घोषणाबाजी करत रुळावर उतरले. यामुळे ही मेट्रो जवळपास दहा मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. वर्सोवाकडे जाणारी मेट्रो रोखल्याने अनेक प्रवासी यामध्ये अडकले. मेट्रो सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारे मेट्रो रोखली गेली. यामुळे घाटकोपर ते एअरपोर्ट रोड दरम्यानच्या मेट्रो वाहतुकीवर परिणाम झाल्याने या स्थानकांदरम्यानची सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय 11.30 वाजता एमएमओपीएलने घेतला. एअरपोर्ट रोड ते वर्सोवा दरम्यानची मेट्रो सेवा सुरू होती. घाटकोपर ते एअरपोर्ट रोड दरम्यानच्या सर्व मेट्रोस्थानकांचे दरवाजे एमएमओपीएलने बंद करून घेत प्रवाशांना बाहेर जाण्यास सांगितले.     

घाटकोपर ते वर्सोवा दरम्यानच्या संपूर्ण मार्गिकेची सेवा 4 वाजून 55 मिनिटांपर्यंत बंद होती. सायंकाळी 5 वाजता मेट्रो सेवा पूर्ववत झाल्याची घोषणा एमएमओपीएलने केली. तब्बल सहा तासांच्या बंदमुळे या मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले.