Tue, Mar 26, 2019 07:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई तुंबली तर, सरकार जबाबदार!

मुंबई तुंबली तर, सरकार जबाबदार!

Published On: May 17 2018 2:21AM | Last Updated: May 17 2018 2:16AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामामुळे यंदा शहरात पाणी तुंबणार अशी भीती बुधवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पाणी तुंबण्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील, असा थेट आरोप करत, भाजपाला डिवचले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

पश्‍चिम उपनगरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची बुधवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. यावेळी मेट्रो रेल्वेच्या कामाकडे बोट दाखवत भाजपाला पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे यंदा मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबणार असल्याचा आरोप करत, याची जबाबदारी थेट सरकारवर पर्यायाने भाजपावर टाकली आहे.   राज्य सरकारने विकासाच्या नावावर शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहेत. मुंबईत मेट्रोची कामे सुरू असल्यामुळे पर्जन्यजलवाहिन्या उखडल्या गेल्या. त्या पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची आहे. त्यामुळे मुंबई तुंबली तर जबाबदारी महापालिकेची राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नालेसफाईची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण झाले नाही तर, संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौरांनी यावेळी दिला. 

मुंबईत कधी पाणी तुंबले नव्हते का - भाजपा

महापौरांच्या या आरोपाचा खरपुस समाचार घेत, भाजपाचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी मुंबईत या अगोदर कधी पाणी तुंबले नव्हते का ? असा सवाल केला आहे. 2005 2010, 2011 मध्ये शहरात पाणी तुंबून जनजिवन विस्कळीत झाले तेंव्हा मुंबईत मेट्रोची कामे कुठे सुरू होती. नालेसफाईतील भ्रष्टाचार भाजपाने बाहेर काढला. महापौरांनी मेट्रोकडे बोट न दाखवता, किती टक्के नालेसफाई झाली ते सांगावे. त्यांनी नाल्यात उतरून काय पाहिले. काठीने गाळ कसा मापला, हे सांगावे. परंतू ते न सांगता महापौर मेट्रोच्या कामामुळे मुंबई तुंबण्याची भीती व्यक्त करत आहेत. महापौरांना सरकार व मेट्रोच्या कामाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. मेट्रोची कामे झपाट्याने होत असल्यामुळे ती काहींच्या डोळ्यात खुपत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले की खमंग प्रसिध्दी मिळते, यासाठी मेट्रोच्या नावाने बोंब मारण्यात येत असल्याचा आरोप मनोज कोटक यांनी केला.

90 टक्के नालेसफाई झाल्याचा पालिकेचा दावा

मुंबईत नालेसफाईचे काम जलदगतीने सुरू असून 15 मे पर्यंत 90 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा, पालिकेच्या पर्जन्यजल वाहिनी विभागाने केला आहे. उर्वरित नालेसफाई 31 मे पर्यंत पूर्ण होईल, असा दावाही या विभागाने केला आहे.