Fri, Apr 26, 2019 00:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो प्रकल्पांमुळे ३५ टक्के खासगी वाहतूक कमी होणार : फडणवीस

मेट्रो प्रकल्पांमुळे ३५ टक्के खासगी वाहतूक कमी होणार : फडणवीस

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 1:01AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्यात आली असून मुंबईसह राज्यात उभारण्यात येणार्‍या मेट्रोच्या जाळ्यांमुळे खासगी वाहतूक 35 टक्के कमी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने आयोजित केलेल्या परिसंवादात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शास्वत पायाभूत सुविधा या विषयावर बोलताना राज्यातील पायाभूत प्रकल्पांचे चित्र मांडले. बँकेचे माजी कार्यकारी संचालक पॉल स्पेझ, जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ञ निकोलस स्ट्रेन यांनीही यामध्ये सहभाग घेतला. 

राज्याचा शास्वत विकास हा केंद्रबिंदू ठेवून या ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. राज्याचा विकासदर 15 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.  जलसंवर्धनासाठी मोठ्या धरणांऐवजी लहान लहान जलसंधारणाच्या कामावर लक्ष दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील मेट्रोच्या जाळ्यामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याची आर्थिक स्थिती 2025 पर्यंत एक ट्रिलियन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुंबई, नागपूर व पुणे शहरांमध्ये मेट्रोची उभारणी, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ आदी प्रकल्प सुरू केले आहेत. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे. या महामार्गामुळे नागपूर हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी जोडले जाणार आहे. तसेच या मार्गावर 24 स्मार्ट सिटींची निर्मिती होणार आहे. या महामार्गामुळे कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळून विकास दर वाढीस मदत होणार असल्याचे ते म्हणाले.