Mon, Mar 25, 2019 09:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गिरगावकर जाणार कुठे?

गिरगावकर जाणार कुठे?

Published On: May 22 2018 1:47AM | Last Updated: May 22 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी 

आहे त्याच ठिकाणी घरे देण्याचा शब्द मेट्रोने बैठकीत दिला. तसे लेखी  आश्‍वासन मात्र मिळत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गिरगावकरांनी मेट्रोविरुद्ध एक प्रकारे बंड पुकारले आहे. आम्हाला जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मेट्रो प्रकल्पासाठी घरे सोडणार नसल्याची ठाम भूमिका गिरगावकरांनी घेतली आहे. सध्या आम्ही राहत असलेल्या परिसरामध्येच आम्हाला घरे द्या, अशी आग्रही मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)  कोणतेही ठोस लेखी आश्‍वासन देत नसल्याने हे रहिवासी संतप्त झाले आहेत.  

घरांवर चिकटवलेल्या ज्या नोटिसांनी गिरगावातील मेट्रोग्रस्त रहिवाशांची झोप उडाली त्या नोटिसांचे गूढ कायम असतानाच आता या रहिवाशांवर एक तर मुंबईत अन्य भागांत भाड्याचे घर शोधा किंवा वडाळा, कांजूरमार्गच्या संक्रमण शिबिरात राहायला जा, असे दोन पर्याय एमएमआरसीने ठेवले आहेत. आणि एमएमआरसी जे 25 हजार रुपये दरमहा भाडे देणार आहे त्यात गिरगावबाहेरच्या मुंबईत कुठे घर मिळणार, असाही प्रश्‍न आहे.

संक्रमण शिबिरात कुठे?

मेट्रो-3 प्रकल्प सुरू असताना बाधित होणार्‍या रहिवाशांना वडाळा, कांजुरमार्ग येथील संक्रमण शिबिरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्याचे नियोजन असल्याचे एमएमआरसीने बैठकीमध्ये स्पष्ट केल्यामुळे गिरगावकर हादरून गेले आहेत. जे रहिवासी संक्रमण शिबिरामध्ये जाणार नाहीत त्यांना 25 हजार भाडे देण्यात येणार असले तरी  म्हणजे गिरगावात इतक्या प्रचंड संख्येने भाड्याची घरे मिळणार नाहीत आणि गिरगाव सोडून काही महिन्यांसाठी का होईना, संक्रमण शिबिरात जाण्याच्या विचारानेही त्यांच्या अंगावर काटा येतो. विस्थापित होणार्‍या गिरगावकरांसाठी गिरगावातच भाड्याची घरे शोधणे कठीण असल्याने एमएमआरसीसमोरही कांजूरमार्ग किंवा वडाळ्याच्या संक्रमण शिबिरांशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे हा पेच कसा सुटणार हा प्रश्‍नच आहे.

त्याच ठिकाणी कायमस्वरूपी घरे? 

काळबादेवी आणि गिरगाव स्थानकांच्या बांधकामासाठी क्रांती नगर, अन्नपूर्णा इमारतींसह एकूण 21 इमारतींचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियमाअंतर्गत वाटाघाटींद्वारे अधिग्रहण करण्यात येत आहे. त्यासाठी जमीन मालकांना वाटाघाटीसाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत, असे एमएमआरसीने स्पष्ट केले. वाटाघाटी अंती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि इमारतीच्या मालकांच्या परस्पर संमतीने आणि भरपाई समितीच्या मान्यतेनंतर मालकांना भरपाई देण्यात येत आहे, असेही एमएमआरसीने स्पष्ट केले आहे.  म्हाडाने प्रमाणित केलेल्या भाडेकरूंना पुनर्विकास आराखड्या अंतर्गत ते राहात असलेल्या ठिकाणीच घरे देण्यात येणार आहेत.

कुठल्याही भाडेकरूला घरे रिकामी करण्यासंबंधी नोटीस कॉर्पोरेशनद्वारे बजावण्यात आलेली नाही किंबहुना सातत्याने भाडेकरूंच्या बैठका घेऊन त्यांच्या संमतीने तात्पुरत्या स्वरूपात भाड्याच्या घरांमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे असेही प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी पुढारीला सांगितले.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गिकेचे काम एमएमआरसीमार्फत सुरू आहे. या मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी गिरगावमधील पाच इमारतींमधील रहिवाशांसोबत एमएमआरसीची नुकतीच बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये रहिवाशांचे म्हणणे एकून घेऊन त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये कुठे जागा देणार यावर चर्चा करण्यात आली होती. यावेळी काही रहिवाशांनी आक्रमक होऊन जोपर्यंत आम्हाला लेखी हमी दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही या प्रकल्पासाठी घरे खाली करणार नसल्याची भूमिका घेतली होती. यावर काही रहिवाशांनी आमचा प्रकल्पाला विरोध नाही, मात्र आम्हाला प्रपोज अ‍ॅग्रिमेंट नको आम्हाला रजिस्टर अ‍ॅग्रिमेंट द्या, अशी आमची मागणी असल्याचे पुढारीस सांगितले.

मेट्रो-3 मार्गिकेचे गिरगाव मेट्रो स्थानक बनवण्यासाठी एमएमआरसीने गिरगावमधील तारामहल, सूर्यामहल, चंद्रमहल, अन्नपूर्णा निवास, सायमन रूबेन या इमारतींच्या जमीन मालकांना वाटाघाटीसाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. 10 मे रोजी एमएमआरसी आणि येथील रहिवासी यांच्यामध्ये एक बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये या पाच इमारतींमधील रहिवासी, दुकानदार आणि एमएमआरसीचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा पार पडली. रहिवाशांच्या संमतीनंतरच त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरण केले जाणार असून त्यांना कायमस्वरूपी घरे जास्त मोठ्या आकाराची आणि ते राहात असलेल्या ठिकाणीच देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.