होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्टला मेट्रो रेल्वेचे आव्हान!

बेस्टला मेट्रो रेल्वेचे आव्हान!

Published On: Aug 07 2018 1:41AM | Last Updated: Aug 07 2018 1:19AMमुंबई : राजेश सावंत

बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती दोलायमान झाली आहे. कर्मचार्‍यांना वेळेत पगार देण्यासाठी तिजोरीत पैसे नाहीत. प्रवाशांना चांगल्या सेवा-सुविधा देण्याच्या घोषणा होतात, पण त्याची अंमलबजावणीसाठी तिजोरीत पैसेच नसल्यामुळे या योजना कागदावरच राहतात. त्यात मेट्रो रेल्वे हे बेस्टसाठी येणार्‍या काळातील मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनाही नसल्यामुळे येणारे दिवस बेस्टसाठी खडतर आहेत. 

बेस्ट उपक्रमाचा इतिहास 100 वर्षे जुना आहे. पण 7 ऑगस्ट 1947 मध्ये बेस्टचे मुंबई महापालिकेत विलीनीकरण झाल्यामुळे हा दिवस बेस्ट दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बेस्टचा मागील एक दशकापूर्वीचा काळ चांगला होता. प्रवाशांना चांगल्या सेवा-सुविधाच नाही तर, कर्मचार्‍यांनाही वेळेत पगार व अन्य सेवा-सुविधांचा लाभ मिळत होता. पण 2005 पासून बेस्टची आर्थिक परिस्थिती बिघडत गेली. प्रवासीसंख्या 47 लाखांवरून दररोज 27 ते 28 लाखांपर्यंत खाली आली. याचा थेट परिणाम अर्थसंकल्पावर झाला. आज बेस्टची तूट सुमारे 850 कोटी रुपयांच्या घरात आहे. ही तूट भरून काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सेवा-सुविधांना कात्री लावत, त्यांच्यावर अनेकदा भाडेवाढ लादली गेली. त्यामुळे प्रवासी बेस्टपासून दुरावला गेला. या दुरावलेल्या प्रवाशांना पुन्हा बेस्टकडे आणण्यासाठी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनाच नाहीत. 

प्रवाशांना चांगल्या सेवा-सुविधा द्यायच्या तर, पैसा नाही. वेळेत पगार नसल्यामुळे कर्मचारीही दुखावला गेला आहे. अशा परिस्थितीत आता मुंबईत मेट्रो रेल्वे जाळे वाढणार आहे. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या अजूनच कमी होणार असल्याची भीती खुद्द प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी करत आहेत. वेसावे-घाटकोपर मेट्रो रेल्वे सुरू झाली तेव्हा बेस्टच्या प्रवाशांच्या संख्येत दररोज सुमारे 70 ते 80 हजाराने कपात झाली. मेट्रो रेल्वेचा जलद प्रवास असल्यामुळे बेस्ट बसने जाणे प्रवासी टाळू लागले. त्यामुळे अंधेरी-घाटकोपर मार्गावरील बसमार्गांची संख्या 100 हून कमी करावी लागली. अंधेरी स्टेशन ते वेसावे आदी भागात बसने प्रवास करणारे प्रवासी मेट्रोने प्रवास करू लागले. बेस्टची प्रवासीसंख्या वाढवण्यासाठी बेस्टकडे कोणतीच उपाययोजना सध्यातरी दिसत नाही. उलट एसी बससेवा बंद करून, बेस्टने आपली ऐपत नसल्याचे दाखवून दिले आहे. हे प्रवासी सध्या मुंबईलगतच्या नवी मुंबई व ठाणे परिवहन सेवेच्या एसी बसमधून प्रवास करत आहेत.