Fri, May 29, 2020 00:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रोचा ५१ मीटर भुयारी मार्ग पूर्ण

मेट्रोचा ५१ मीटर भुयारी मार्ग पूर्ण

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:26AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

कुलाबा-वांद्रे-सीप्झ  या मेट्रो-3 मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कमाला लवकरच गती येणार आहे. या मार्गिकेदरम्यान नयानगर येथील भुयारी मार्गावर शाफ्टमध्ये बसवण्यात आलेल्या टनेल बोरिंग मशिनद्वारे (टीबीएम) आत्तापर्यंत 51 मीटर लांबीपर्यंतच्या भुयाराचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सुरुवातीला या मशीनचा वेग कमी असतो नंतर या कामाला गती येऊन भुयारीकरणाच्या कामाचाही वेग वाढेल, असे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे. तसेच 51 मीटर लांबीपर्यंतच्या भुयारीकरणाच्या कामादरम्यान 250 क्युबिक टन माती बाहेर काढण्यात आली असल्याचेही एमएमआरसीने स्पष्ट केले आहे. 

सध्या माहीम येथे कार्यरत असलेली मशिन सिद्धिविनायक मंदिर ते शीतलादेवी या पट्ट्यामध्ये खोदकाम करत आहे. त्यासाठी याठिकाणी दोन मशिन ठेवण्यात आल्या आहेत. 12 टीबीएम मशिनच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चार मशिन यापूर्वीच प्रकल्पस्थळी दाखल झाल्या आहेत. 13 मशिन्स फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबईमध्ये येतील. या मशिन्स जमिनीच्या खाली 25 ते 30 मीटर खोल भागात काम करतात. त्यामुळे पृष्ठभागावर किंवा आसपासच्या बांधकामांना किंवा निवासी इमारतींना कंपने जाणवण्याची शक्यता कमी असल्याचा दावाही एमएमआरसीएने केला आहे. 

मेट्रो-3 मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम 10 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. अद्याप 51 मीटरच्या भुयारीकरणाचे काम झाले आहे. मात्र सुरुवातीच्या 60 दिवसांमध्ये ही मशिन कमी वेगाने भुयारीकरण करते. मात्र जेव्हा मशिन पूर्णपणे आतमध्ये जाते तेव्हा 24 तासांत 10 मीटरपर्यंत लांब भुयार बनवू शकते. या मशिनचा वेग 15 जानेवारीपर्यंत आणखी वाढेल, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. संपूर्ण मार्गिकेवर आता सहा ठिकाणी या टीबीएम कार्यरत करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी एकूण 17 टीबीएम मशिन्स वापरण्यात येणार आहेत. या सहा ठिकाणी विहिरी (शाफ्ट) खणण्यात आल्या आहेत.