Mon, Apr 22, 2019 11:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भूगर्भ पोखरत जातोय...अन् थांगपत्ताही लागत नाही

भूगर्भ पोखरत जातोय..अन् थांगपत्ताही लागत नाही

Published On: Jan 22 2018 1:48AM | Last Updated: Jan 22 2018 1:48AMमुंबई : प्रतिनिधी

सतत धावणार्‍या मुंबईच्या रस्त्यांवर गोंधळ, गोंगाट, ट्राफिक जॅम्स आणि हॉर्नचे कर्णकर्कश आवाज हे चित्र आजही रोज आपण अनुभवतो. त्याचवेळी या मुंबईच्या भूगर्भाला पोखरण्यासाठी एकाच वेळी तीन मार्गांवर अजस्त्र यंत्रे धडधडत आहेत आणि त्यांचा आवाजही कुणाच्या कानी पडत नाही, इतके शिस्तीत हे काम सुरू आहे. 

मुंबईत सध्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मेट्रो 3 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. जमिनीच्या खाली 100 फुटांवर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी हजारो हात आणि यंत्रसामग्री सध्या राबत आहे. एकूण 7600 कुशल आणि अकुशल कर्मचारी यासाठी राबत आहेत.

दक्षिण मुंबईतील कुलाबा ते उपनगरातील सिप्झ असा हा 33.5 किलोमीटरचा भूयारी मार्ग असेल आणि आतापर्यंत फक्‍त  220 मीटरचा बोगदा खोदला गेला आहे. मुंबईच्या आयुष्यातील भुयारी मार्गाचा असा  हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहराच्या दृष्टीने वाहतुकीसाठी खर्‍या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. 

मेट्रो 3 दोन हजारहून अधिक इमारतींवरुन धावणार असून, प्रकल्पासाठीच्या जमिनीतील खोदकामामुळे वारसा इमारती आणि जुन्या इमारतींच्या बांधकामांना धोका पोहोचेल, अशी भीती व्यक्‍त केली जात होती. मात्र हा धोका टाळण्यासाठी मुुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने चांगलीच तयारी केली आहे. प्रकल्पबाधित 1500 कुटुंबांना हलविण्यात आले असून, 7 हजार 600 कुशल आणि अकुशल कामगार या प्रकल्पासाठी सध्या राबत आहेत. 

कुलाब्यापासून सिप्झपर्यंतच्या या प्रकल्पात 27 स्थानके आहेत. त्यापैकी 26 स्थानके भूमिगत असणार आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी या प्रकल्पाच्या कामामुळे जुन्या इमारतींना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्‍त केली आहे. ही भीती निराधार असल्याचे सांगताना, एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी भिडे म्हणतात, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरण्यात आले आहे. त्यामुळे असा प्रश्‍नच उद्भवत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर चाचणी घेण्यात आलेली 20 प्रकारची उपकरणे, प्रकल्पाच्या मार्गात येणार्‍या इमारतींच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत. 

या प्रकल्पामुळे लोकलसेवेवर पडणारा प्रवाशांचा भार कमी होणार आहे.  लोकल प्रवासात अतिगर्दीमुळे दरवर्षी हजारो लोकांचा बळी जातो. मेट्रोमुळे हे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.