Tue, Mar 26, 2019 01:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो 3ः रात्रीच्या कामाला स्थगितीच

मेट्रो 3ः रात्रीच्या कामाला स्थगितीच

Published On: Jul 19 2018 2:05AM | Last Updated: Jul 19 2018 2:05AMमुंबई : प्रतिनिधी 

अंधेरी सीप्झ ते कुलाबा या मेट्रो 3 च्या  प्रकल्पासाठी दक्षिण मुंबईतील कफ परेड भागात रात्रीच्यावेळी कामावरील स्थगिती उच्च न्यायालयाने  तूर्त कायम ठेवली आहे. मेट्रो प्रकल्प हा लोकहिताचा असला तरी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अहवालानंतर रात्रीच्या कामाला परवानगी देण्यासंंबंधी  फैसला दिला जाईल, असे न्यायमूर्ती  अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने याचिकेची पुढील सुनावणी 2 ऑगस्ट पर्यंत तहकूब ठेवली.

ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावरून डिसेंबर 2017  पासून रात्रीच्या वेळी मेट्रोच्या कामावर न्यायालयाने घातलेली बंदी उठवावी आणि 24 तास काम करण्यास परवानगी द्यावी,  अशी विनंती करणारा अर्ज मेट्रो  प्रशासनाने उच्च न्यायालयात केला आहे. तर,दक्षिण मुंबईतील स्थानिक नागरिक रॉबीन जयसिंघानी यांनी आक्षेप घेतला आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी कोकण रेल्वेच्या कामाच्यावेळीही मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्णय  न्यायालयात सादर करून  रेल्वे प्रमाणेच मेट्रोच्या प्रकल्पालाही पर्यावरणाच्या नियमांचे बंधन नसल्याचा  दावा केला.तसेच   निरी या संस्थेने केलेल्या तपासणीत शहरात दिवसा  सरासरी 80 ते 85  डेसिबल इतका आवाज होत असून मेट्रोच्या कामाचा  आवाज यापेक्षा कमी आहे.याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.