Fri, Aug 23, 2019 22:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो ३ च्या रात्रपाळीला हिरवा कंदील 

मेट्रो ३ च्या रात्रपाळीला हिरवा कंदील 

Published On: Aug 25 2018 1:36AM | Last Updated: Aug 25 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

दक्षिण मुंबईत मेट्रो 3 च्या रात्रीच्या कामाला गेले नऊ महिने स्थगिती दिल्याने मेटाकुटीला आलेल्या एमएमआरडीएला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने रात्रीच्या कामाला परवानगी देतानाच ध्वनिप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्या. त्यासाठी निरीने आखून दिलेल्या निर्देशांप्रमाणे आणि राज्य सरकारने कबूल केल्याप्रमाणे आठवड्याभरात सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देशही दिले.

दक्षिण मुंबईत रात्रीच्या वेळी मेट्रोचे काम करण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठवण्याची विनंती करणारा अर्ज मेट्रो प्रशासनाने उच्च न्यायालयात केला. त्यास दक्षिण मुंबईतील स्थानिक नागरिक रॉबिन जयसिंघानी यांनी आक्षेप घेतला. या अर्जावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती  नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांचे आवाज, मशिदींवरील भोंगे, विविध विकासकामांमुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी केव्हाच ओलांडली आहे. त्यामुळे मेट्रोचा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. मेट्रोच्या कामाचा या आवाजाच्या पातळीवर काही फरक पडणार नाही, असा दावा अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी केला. खोदकाम करताना भूगर्भातून निघणारी माती एमएमआरडीएकडून रात्रीच्या वेळेतच वाहून नेण्यात येणार आहे जेणेकरून या भागात ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार नाही, अशी माहिती न्यायालयाला दिली.

ध्वनिप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्या : हायकोर्ट 

निरीच्या अहवालानुसार, मेट्रोच्या कामामुळे दिवसाला 68.5 ते 91.9 डेसिबल इतके ध्वनिप्रदूषण होते, तर रात्रीच्या वेळी 60.3 ते 83.4 डेसिबल इतके ध्वनिप्रदूषण होते. ती कमी करण्यासाठी निरी या संस्थेने नॉईस बॅरिअरचा उपाय सुचवला आहे.  ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरूनच हायकोर्टाने डिसेंबर 2017 पासून मेट्रो 3 साठीच्या रात्रपाळीच्या कामावर बंदी घातली होती.