Mon, Jul 22, 2019 03:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो ३ : २६७ मीटर भुयार पूर्ण!

मेट्रो ३ : २६७ मीटर भुयार पूर्ण!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेच्या बांधकामाचे कंत्राट देऊन आता 18 महिने पूर्ण झाले असून या कालावधीमध्ये अनेक महत्वाच्या कामांना गती आली आहे. या मार्गिकेचे सात टप्प्यांमध्ये काम करण्यात येत असून आत्तापर्यंत या संपूर्ण मार्गिकेमध्ये एकूण 1 हजार 267 मीटर लांबीच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्यावतीने देण्यात आली आहे. 

मुंबईत विविध ठिकाणी होत असलेल्या भुयारीकरणाच्या कामाकरिता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) 17 टनेल बोअरिंग मशिसची (टीबीएम) गरज भासणार असून त्यापैकी 11 मशिन्स शहरात दाखल झाले आहेत. आतापर्यंत 8 मशीन्सद्वारे भुयारीकरणाचे काम करण्यात येत आहे.

आझाद मैदान येथील पॅकेज-2 मध्ये वैतरणा 1 आणि 2 टीबीएमद्वारे ग्रँट रोड पर्यंत 4.5 किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 330 मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे. नयानगर येथे पॅकेज-4 अंतर्गत कृष्णा 1 आणि 2 या टीबीएमद्वारे दादर मेट्रो स्थानकापर्यंत 2.5 किमी भुयारीकरण करण्यात येणार असून त्यापैकी 492 मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे. विद्यानगरी येथे पॅकेज- 5 अंतर्गत गोदावरी 1 आणि 2 या मशिन्सद्वारे आंतरदेशीय विमानतळ स्थानकापर्यंत 2.98 किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. 

नोव्हेंबर 2017 मध्ये भुयारीकरणास सुरुवात केल्यानंतर आज आम्ही 8 टीबीएमद्वारे 1200 मीटर पेक्षा अधिक भुयारीकरण पूर्ण केले आहे. प्रकल्पाच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे, असे एमएमआरसीच्या  व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या. तसेच 14 टीबीएमचे कारखाना स्वीकृती परिक्षण पूर्ण झाले असून प्रकल्पाला आवश्यक असणार्‍या 17 ही टीबीएम्स जुलैअखेर दाखल होऊन भुयारीकरणास प्रारंभ करणे अपेक्षित आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. 


  •