Wed, Apr 24, 2019 21:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माथाडी मंडळांचे विलीनीकरण रद्द!

माथाडी मंडळांचे विलीनीकरण रद्द!

Published On: Feb 01 2018 2:17AM | Last Updated: Feb 01 2018 2:17AMनवी मुंबई : प्रतिनिधी

माथाडी कामगारांच्या मंडळासह 36 कामगार मंडळांचे विलीनीकरण करण्यासंबंधी सरकारने काढलेला अध्यादेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  माथाडी कामगार संघटनांनी मंगळवारी केलेल्या महाराष्ट्र बंदची दखल घेत बुधवारी कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती माथाडी नेते व आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली. 

माथाडी कायदा व मंडळाच्या योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासंदर्भात माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समितीची डॉ.बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे उद्या गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे.शासन निर्णयामुळे माथाडी कायदा व माथाडी मंडळांच्या योजना मोडीत काढण्याचा शासनाने प्रयत्न केला होता, यामुळे होणार्‍या दुष्परिणामासंबंधी व इतर समस्यांच्या बाबतीत डॉ.बाबा आढाव, आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील,आमदार शशिकांत शिंदे, आमदार भाई जगताप, बळवंतराव पवार आदी नेत्यांनी कामगार मंत्र्यांकडे सक्षम बाजू मांडली.

उद्योग व कामगार विभागाने काढलेल्या शासन निर्णयाला स्थगिती देऊन सर्व संबंधित घटकांना अभ्यास गटाच्या समितीत घेऊन माथाडी कायदा व बोर्डाच्या योजनांमध्ये सुसूत्रता आणण्याचा आणि सर्वांना विश्वासात घेऊनच कामगार विभागाकडून निर्णय घेतला जाईल,असेही कामगार मंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

कामगार विभागाने काढलेल्या 6 सप्टेंबर 2016 व 17 जानेवारीच्या शासन निर्णयास तातडीने रद्द करण्याचे आणि माथाडी कायदा व मंडळाच्या योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शासनाचे अधिकारी व माथाडी कामगारांचेप्रतिनिधीत्व करणार्‍या कामगार संघटनांच्या अनुभवी नेत्यांचा समावेश असलेली समिती गठीत करुन सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील, असे संभाजी पाटील-निलंगेकर यांनी जाहीर केले,या निर्णयाबद्दल सर्व संघटनांच्या माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समितीने कामगार मंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

या बैठकीला विविध कामगार संघटनांचे नेते डॉ.बाबा आढाव,आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार भाई जगताप,राजकुमार घायाळ,बळवंतराव पवार, दीपक रामिष्टे, पोपटराव पाटील,जयवंतराव पिसाळ,नंदाताई भोसले,शिवाजी सुर्वे,निवृत्ती धुमाळ,सतीश जाधव,तानाजी कदम,लक्ष्मणराव भोसले, हणमंतराव सुरवसे, अर्जुनराव दिवाळे, रवींद्र जाधव,शिवाजी पाटील,रमेश शेंडगे आदी कामगार नेते तसेच कामगार सचिव राजेशकुमार,सह सचिव विधळे,कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम,सह कामगार आयुक्त (माथाडी) लाखस्वार,सहाय्यक कामगार आयुक्त विश्वास जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.