Tue, Feb 19, 2019 20:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल

मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील करी रोड स्थानकात लष्करातर्फे पादचारी पुलाच्या कामाला वेग आला असून लवकरच पुलाचे  काम जरी पूर्ण होणार असले तरी रविवारी तब्बल आठ तासाच्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मात्र मेगा हाल झाले. दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकादरम्यानची वाहतूक पूर्णत: बंद असल्याने मुंबई दर्शन करण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांवर आपला खिसा खाली करण्याची वेळ आली.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईत विविध ठिकाणी पादचारी पुल उभारण्याचे रेल्वेने ठरवले आहे. हे सर्व पादचारी पुल बांधण्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्करामार्फत आंबिवली, एल्फिन्स्टन-परळ येथे पादचारी पूल उभारण्यात आला. आंबिवली पुलाचे काम पूर्ण झाले असून, एल्फिन्स्टन-परळ पुलाची उभारणी झाली आहे. करी रोड येथील पुलासाठी रविवारी सकाळी 8.30 ते दुपारी 4.30 पर्यंत (8तास) अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला. आठ तासांच्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांना रविवारी पूर्ण दिवसभर प्रवास करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. मेगाब्लॉक संपल्यानंतरही वाहतूक वेळेवर सुरु न झाल्याने मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मेगाब्लॉक संपल्यानंतरही लष्कराकडून पुलाचे काम सुरुच होते. लवकरच पुलाचे काम संपणार असून तीनही पुल मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत. मुंबईकरांना मेगाब्लॉकमुळे जरी प्रवास करताना हाल सहन करावे लागत असले तरी मात्र लष्कराच्या कामाचे मुंबईकर कौतुक करताना दिसून आले.

ब्लॉक काळात सीएसएमटी-दादर धिम्या आणि जलद मार्गावरील दोन्ही दिशेकडील लोकल फेर्‍या पूर्णपणे रद्द करण्यात आल्याने मुंबई दर्शन करण्यास बाहेर पडलेल्या प्रवाशांना ओला-उबेर आणि टॅक्सीचा आधार घ्यावा लागला. मेगा ब्लॉकचा फायदा मुंबई-पुणे खासगी वाहतुक करणार्‍यांनी चांगलाच घेतला. परिणामी त्यांच्या खिशालाही झळ सोसावी लागली.    

ब्लॉकमुळे मेल-एक्स्प्रेस फेर्‍यांवरदेखील परिणाम झाला. शनिवारी धावणार्‍या सह्याद्री एक्स्प्रेस आणि सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. रविवारी धावणार्‍या सिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि सह्याद्री एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने पुणे, कोल्हापूरकडे जाणार्‍या प्रवाशांनाही प्रचंड हाल सोसावे लागले. परिणामी त्यांनी दादर येथून खासगी वाहणांचा वापर करुन कसेबसे घर गाठण्याचा प्रयत्न केला.