Tue, Mar 26, 2019 07:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी 

पश्‍चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रूळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेची तपासणी आणि ओव्हरहेड वायर अशा कामांकरता रेल्वेच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना रविवारी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा लागणार आहे. अन्यथा प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. पश्‍चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या काळात मेगाब्लॉक घेण्यात आला असल्याने यामार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

मध्य रेल्वेच्या मार्गिकेवर माटुंगा-ठाणे डाउन धीम्या रविवारी सकाळी 11:20 ते सायंकाळी 04:20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. सकाळी 10.57 ते 4.20 वाजेपर्यंत माटुंग्यावरून सुटणार्‍या सर्व धीम्या लोकल या माटुंगा अथवा ठाणे स्थानकांच्या मध्य डाऊन फास्ट मार्गिकेवरून चालवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर या लोकल थांबतील. यापुढे मुलूंड स्थानकावर धीम्या गतीच्या मार्गिकेवर वळवण्यात येतील. विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकांवर धीम्या मार्गिकेवरील लोकल चालवण्यात येणार नाहीत.

या ब्लॉक दरम्यान प्रवाशंना घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवरून प्रवास करता येणार आहे. तसेच सकाळी 10.54 वाजल्यापासून दुपारी 3.06 वाजेपर्यंत कल्याणवरून सुटणार्‍या सर्व अप फास्ट लोकल आपल्या वेळेनुसार दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील, तसेच या गाड्या 15 मिनिटे उशिरा धावतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच सकाळी 10.47 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणार्‍या सर्व जलद लोकल आपल्या निर्धारीत स्थानकांच्या व्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड तथा दिवा स्थानकांवर थांबतील. तसेच या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनस महाराज स्थानकावर येणार्‍या आणि जाणार्‍या सर्व धीम्या गाड्या दहा मिनिटे उशिराने धावतील.