Wed, May 22, 2019 16:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेनसाठी जमिनी मागाल तर रस्त्यावर उतरू : शरद पवार

बुलेट ट्रेनसाठी जमिनी मागाल तर रस्त्यावर उतरू : शरद पवार

Published On: Mar 25 2018 2:20AM | Last Updated: Mar 25 2018 1:34AMडहाणू/पालघर :वार्ताहर

विकासाचे प्रकल्प राबवताना स्थानिक रोजगार आणि शेती उद्ध्वस्त न करता त्याला पर्याय शोधले पाहिजेत. भूमिपुत्रांचे नुकसान करणारे प्रकल्प डहाणूत होऊ नयेत यासाठी, तसेच वाढवण बंदराविरोधातील आवाज आपण संसदेत उठवणार आहोत, बुलेट ट्रेनसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी मागायला आलात, तर रस्त्यावर उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला. डहाणूत रिलायन्स सभागृहात स्थानिक उद्योजक, मच्छीमार, बागायतदार, उद्योजक, भूमिपुत्रांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 

स्थानिक लोकांचा रोजगार उद्ध्वस्त होत असेल तर त्या प्रकल्पांना आमचा पाठिंबा  नाही, असे पवार म्हणाले. एका विशिष्ट टापूमध्ये इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, मुंबई-बडोदा महामार्ग, बुलेट ट्रेन हे तीन  प्रकल्प होऊ घातले आहेत. एक उद्देशासाठी तीन प्रकल्प हाती घेणे, त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेणे अयोग्य आहे, असेही ते हणाले. या तीन प्रकल्पांतून एकच पर्याय निघेल का? याचा विचार करण्याच्या सूचना आपण केंद्र सरकारला करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. खरोखरच बुलेट ट्रेनची आवश्यकता आहे का? असा सवालही त्यांनी केला.

शेती, फलोत्पादन विकासाशी निगडित आहेत. पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. शेती, शेतकरी टिकला पाहिजे, रोजगाराचे नवे मार्ग शोधले तर खर्‍या अर्थाने देश पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता कमी असून गोंदिया लोकसभेवर पालघर लोकसभेचा निर्णय  कायम राहील. आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी समविचारी पक्षाबरोबर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान बनण्याबाबत राहुल गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार आनंद ठाकूर, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आ.जितेंद्र आव्हाड, वैभव संखे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद हिंदुराव,डहाणू तालुका अध्यक्ष राजेश पारेख वाढवण बंदर कृती संघर्ष समिती तसेच मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

Tags : mumbai news, Meeting, Dahanu Rilance Hall,  Sharad Pawar, Hint,