होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केरळमधील पुरग्रस्‍तांसाठी महाराष्ट्रातून ट्रकभर औषधं

केरळमधील पुरग्रस्‍तांसाठी महाराष्ट्रातून ट्रकभर औषधं

Published On: Aug 20 2018 7:02PM | Last Updated: Aug 20 2018 7:10PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीतील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासन पुढे सरसावले आहे. जीवनावश्यक वस्तू, कपडे आदी साहित्य काल रविवारी केरळला रवाना करण्यात आले. उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आज, सोमवार सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शंभर जणांचे वैद्यकीय पथक व ट्रक भरून औषधांसह पथक केरळला रवाना झाले. 

Image may contain: 2 people, people standing

केरळमध्ये अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असून पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. या नैसर्गिक संकटप्रसंगी सर्व आवश्यक ती मदत पुरविण्यास राज्य शासनाने सुरुवात केली आहे. आज सोमवारी शंभर जणांचे वैद्यकीय पथक ट्रक भरून औषधांसह केरळला रवाना झाले आहे. या वैद्यकीय पथकामध्ये जे. जे. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. श्रीनिवास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ५० तर, ससून रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. गजानन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली २६ वैद्यकीय अधिकारी त्याशिवाय  इतर स्वयंसेवक-सहकार्‍यांसह शंभर जण सहभागी झाले आहेत. 

Image may contain: 2 people, people standing and outdoor

तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून २० कोटी रुपये केरळच्या पूरग्रस्तांसाठी दिले असून अन्नधान्य, कपडे आणि अत्यावश्यक साहित्य केरळकडे रवाना केले आहे. यासाठी मंत्रालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

केरळमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा पुरविणार: गिरीश महाजन

केरळमध्ये अतिवृष्टीतील पूरग्रस्तांसाठी जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शंभर जणांच्या वैद्यकीय पथकासोबत केरळकडे रवाना होत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. केरळमध्ये पूरामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता केरळच्या जनतेला मदत करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत पुरवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

Image may contain: 1 person, standing and outdoor
केवळ नाममात्र आरोग्य सेवा न पुरविता सर्जरी, मेडिसीन, बालरोग, स्त्रीरोग, प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसीनच्या तज्ज्ञांचा या पथकात समावेश करण्यात आला असून आवश्यक ती सर्व औषधे, गोळ्या, सलाईन्स आणि सामग्री या पथकासोबत देण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास पुन्हा दुसरे वैद्यकीय पथक केरळमध्ये येत्या दोन-तीन दिवसात पाठविण्यात येईल आणि केरळमध्ये दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्याचे काम हे वैद्यकीय पथक करेल, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.