मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील वैद्यकीय महा विद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची मुदत बुधवारी संपत असून प्रवेशासाठी यंदा नव्याने लागू झालेल्या मराठा ( एसईबीसी) व आर्थिक दुर्बलांचा आरक्षणाचा (सवर्ण) लाभ घेणार्या विद्याथ्यार्ंसह पूर्वीच्या आरक्षित प्रवर्गासह विद्यार्थ्यांना दाखले तालुक्याच्या ठिकाणी वेळेत मिळत नसल्याने या प्रवेशाची मुदत वाढवा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. आरक्षण मिळाले, मात्र जातीचा दाखलाच हातात नसल्याने प्रवेशाचा नवा पेच विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.
गेल्या 22 जूनपासून एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आदी मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशाला राज्यात प्रारंभ झाला आहे. या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल)ने जाहीर केलेल्या वेळापत्रकाची मुदत उद्या संपणार आहे. मात्र यावर्षी नव्याने लागू झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज मेमध्येच केले आहेत. मात्र तालुका तहसीलस्तरावर मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने दाखले वेळेत मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची अडचण आहे.
अनेक विद्यार्थी दररोज हेलपाटे मारत आहेत. मात्र दाखलेच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावे लागणार आहेत. आरक्षण मिळून फायदा काय, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत. अनेक पालक तालुक्याच्या गावी ठाण मांडून असून दाखल्यासाठी अधिकार्यांच्या विनवण्या करत आहेत. मात्र तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचारी कमी आहेत. चार दिवसांनी या, असे सांगून टोलवत आहेत. त्यामुळे यासाठी सरकारने मार्ग काढवा, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे.
प्रवेशाची नोंदणी शुल्क भरलेले सर्वाधिक पुणे विभागातील 3 हजार 626 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. नाशिक 1687, अहमदनगर 2413, मुंबईत 3 हजार 500, ठाणे 2322 , नागपूर 2597 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना 28 जून ते 3 जुलै या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राधान्यक्रम 29 जून ते 4 जुलै या कालावधीत भरायचे आहेत. प्रवेशाची तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी 4 जुलै रोजी सायंकाळी 5 नंतर जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 5 जुलै रोजी रात्री 8 नंतर जाहीर करण्यात येणार आहे.