होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचे वैद्यकीय पर्यटन लठ्ठ झाले की बारीक?

मुंबईचे वैद्यकीय पर्यटन लठ्ठ झाले की बारीक?

Published On: Feb 11 2018 2:36AM | Last Updated: Feb 11 2018 1:55AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

बदलत्या जीवनशैलीमुळे येणारा लठ्ठपणा ही मुंबई शहरातील आजकालची मोठी समस्या आहे. गेल्या सहा महिन्यांत लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी आणि सुरुवातीच्या काळातच बॅरिअ‍ॅट्रिक पद्धतीची माहिती घेण्यासाठी डॉक्टरांकडे येणार्‍यांची संख्या वाढली आहे. इजिप्‍तची नागरिक असलेली जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद हिच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर हे प्रमाण चांगलेच वाढले आहे. वैद्यकीय पर्यटनवाढीसाठी हे शुभचिन्ह आहे. मात्र विदेशी रुग्णांची संख्या वाढली की कमी झाली, याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञांत मतमतांतरे आहेत. टूर ऑपरेटर्सच्या म्हणण्यानुसार विदेशी रुग्णांची संख्या घटली आहे, मात्र डॉक्टरांनी ही संख्या घटली नसल्याचा दावा केला आहे. मेडिकल टूरिझम लठ्ठ झाला की बारीक हा प्रश्‍न मात्र त्यामुळे कायम आहे.  

इमान अहमद लठ्ठपणावरील उपचारासाठी मुंबईत आली होती. येथील सैफी रुग्णालयात तिच्यावर तीन महिने उपचार करण्यात येत होते. मात्र तिच्या बहिणीचे डॉक्टरांशी मतभेद झाल्यानंतर ती अबू धाबी येथे उपचारांसाठी गेली होती. या घटनेला माध्यमांनी प्रचंड प्रसिद्धी दिली होती. त्यानंतर बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीसाठी भारतात येणार्‍या विदेशी नागरिकांच्या संख्येत घट झाल्याचे वैद्यकीय पर्यटन क्षेत्रातील मध्यस्थांचे म्हणणे आहे. हैदराबाद, मुंबई आणि दिल्‍ली येथील सात रुग्णालये आणि विदेशी रुग्ण यांच्यात मध्यस्थी करणार्‍या हुझेफा अजमेरी यांच्या म्हणण्यानुसार लठ्ठपणावर उपचार घेणार्‍या विदेशी रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यांच्या माध्यमातून 2016 साली भारतात लठ्ठपणावर उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 30-35 इतकी होती. जी 2017 साली 3 वर आली आहे. मध्य पूर्वेतून येणार्‍या रुग्णांच्या संख्येत प्रामुख्याने घट झाली आहे. त्यामागे नेमकी कारणे काय आहेत, ते सांगता येणार नाही, मात्र अनेक महिन्यांपासून ही घट सुरु असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

लठ्ठपणावर उपचार करणार्‍या डॉक्टरांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. इमानवर उपचार करणार्‍या आणि सध्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्‍या डॉ. अपर्णा भास्कर यांच्या म्हणण्यानुसार हे बदल अनेक कारणांचा परिपाक आहे. मध्य पूर्वेतील रुग्णांनी लठ्ठपणावर उपचारासाठी जॉर्डनला पसंती दिली आहे. तिथे बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया 1 ते 1.5 लाख रुपयांत केली जाते. अनेक विदेशी रुग्णांनी दिल्‍लीला पसंती दिल्यामुळे मुंबईत उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या कमी होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. वोक्खार्ट हॉस्पिटलचे डॉ. रमण गोयल यांच्या म्हणण्यानुसार पूर्व आफ्रिका, मध्य पूर्व, युरोप आणि अमेरिका येथील रुग्ण बॅरिअ‍ॅट्रिक उपचारांसाठी भारताला पसंती देतात. कमी किंमत हे भारतातील वैद्यकीय पर्यटनवाढीमागचे प्रमुख कारण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे 340 सदस्य आहेत. डॉ. रमण गोयलही त्यापैकी एक. 2016 साली देशभरात 15 हजार बेरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया झाल्या, असे गोयल यांचे म्हणणे आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत वैद्यकीय पर्यटकांच्या संख्येत कोणताही फरक पडलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. 2017 साली त्यांनी व्यक्‍तीश: 50 विदेशी रुग्णांवर लठ्ठपणावरील उपचार केले आहेत.  ही संख्या 2016 इतकीच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

बीएमआय 40 किंवा 45 च्या पुढे गेल्यानंतरच लोक डॉक्टरांशी संपर्क साधत असत. आता बीएमआय 30 झाल्यावरच लोक डॉक्टर्सकडे जात आहेत, असे बॅरिअ‍ॅट्रिक सर्जन शशांक शहा यांनी सांगितले. त्यांनी गेल्या वर्षात 80 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. 

दोन महिन्यांपूर्वी एका 41 वर्षीय आफ्रिकन महिलेने लठ्ठपणावर उपचारासाठी शाह यांच्याशी संपर्क साधला होता. तिचे वजन 84 किलो होते. तिची आईही अतिलठ्ठ होती आणि त्यातच तिचे निधन झाले होते.  वजन कमी करण्यासाठी त्या महिलेेने बलून सर्जरी करण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. आपण अतिलठ्ठपणाकडे जात आहोत, असे तिला वाटू लागले होते. दोन महिन्यांत तिने 8 किलोनी वजन घटवण्यात यश मिळवले. इमानच्या घटनेनंतर विदेशी रुग्णांच्या संख्येत घट होईल, असे वाटले होते, मात्र ती संख्या स्थिर राहिली, असे शाह यांचे म्हणणे आहे. वजनवाढीबद्दल लोक सजग आहेत, आम्हीही नवीन काहीतरी शिकत आहोत, असे शाह म्हणाले. 

सैफी हॉस्पिटलच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हुझैफा शेहाबी यांच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी कोणत्याही चौकटीचा अभाव आहे. यासाठी वैद्यकीय पर्यटनाच्या अवैद्यकीय विभागाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.  कंबोडिया, व्हिएतनाम आणि लाओस या देशातील नागरिकांचा ओढा भारताकडे वाढू लागला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.