Thu, Apr 18, 2019 16:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सफाई कामगारांच्या मुळावर यांत्रिक झाडू

सफाई कामगारांच्या मुळावर यांत्रिक झाडू

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 2:01AMमुंबई : प्रतिनिधी

हॉस्पिटलसह महापालिका मुख्यालय व अन्य कार्यालयांची साफसफाई खाजगी कंपन्यांच्या मार्फत करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यात आता रस्त्यांच्या साफसफाईसाठी यांत्रिकीकरणावर भर देण्याचे सूतोवाच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केले. त्यामुळे गेली कित्येक वर्षे पिढ्यान्पिढ्या मुंबई शहराची साफसफाई करणार्‍या सफाई कामगारांची संख्या घटणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेची खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. घनकचरा विभागाचे सुमारे 40 टक्केपेक्षा जास्त खाजगीकरण करण्यात आले आहे. सध्या मुंबईतील कचरा उचलण्यासह पालिकेच्या मालमत्तेची सफाई खाजगी संस्थांमार्फत केली जाते. एवढेच काय तर, समुद्रकिनार्‍याची सफाईही खाजगीकरणातून केली जात आहे. त्यामुळे मुंबईकर सकाळी उठायच्या अगोदर संपूर्ण शहर चकाचक करण्यात सफाई कामगारांचा मोठा वाटा आहे. सफाई कामगारांच्या अनेक पिढ्यांनी मुंबई स्वच्छ करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. पण आता याच सफाई कामगारांच्या वारसांना येणार्‍या काळात पालिकेत सफाई कामगारांची नोकरी मिळणे अशक्य आहे.

मुंबईत सध्या यांत्रिकी झाडूद्वारे 246 किमी  लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात येते. तर येणार्‍या वर्षभरात अजून 200 किमी रस्त्यांची यांत्रिकी झाडूने सफाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यांत्रिकी झाडूमुळे रस्त्यावरील स्वच्छतेत सुधारणा झाल्याचे सूतोवाच खुद्द पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात रस्त्यांची सफाई यांत्रिकी झाडूने करण्यावर पालिका प्रशासनाचा भर राहणार असल्याचे सिध्द झाले आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे सफाई कामगारांची नव्याने भरती न करण्याचा विचार पालिका करत असल्याचे समजते. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या 28 हजार सफाई कामगारांची संख्या येणार्‍या काही वर्षात कमी होणार आहे.