Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माझगाव डॉकचा कर्मचारी एटीएसच्या ताब्यात!

माझगाव डॉकचा कर्मचारी एटीएसच्या ताब्यात!

Published On: Aug 26 2018 1:45AM | Last Updated: Aug 26 2018 1:44AMमुंबई : प्रतिनिधी

नालासोपार्‍यात सापडलेली स्फोटके बनविण्यात सहभागी असल्याचा आरोप ठेवत राज्य दहशतवादविरोधी पथकाने मुंबईतील माझगाव डॉकमधील कर्मचारी अविनाश पवार (30) याला शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे माझगाव डॉक आणि घाटकोपरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणातील ही पाचवी अटक असून सत्र न्यायालयाने पवारला 31 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

स्फोटकांप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या संपर्कात पवार असल्याचे उघड होताच एटीएसच्या पथकाने शुक्रवारी दुपारी त्याला माझगाव डॉकमधील कार्यालयातून ताब्यात घेतले. एटीएसचे पथक तेथून त्याला घाटकोपरच्या भटवाडीतील घरी घेऊन गेले. घरामधील झडतीमध्ये एटीएसने संगणकासह पवारचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यानंतर त्याला एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले. कसून चौकशीमध्ये त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर येताच, रात्री त्याला अटक करण्यात आल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले.  

पवारचा बॉम्ब बनविण्यातील सहभाग तपासण्यासोबतच त्याने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण कोठून घेतले? बॉम्ब बनविल्यानंतर स्फोट करण्यासाठी आखलेल्या कटामध्ये पवारचा सहभाग होता का? या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी एटीएसच्यावतीने सरकारी वकिलांनी शनिवारी सकाळी न्यायालयाकडे त्याची कोठडी मागितली.  न्यायालयाने त्याला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश बजावले. एटीएसने 9 ऑगस्टच्या रात्री नालासोपार्‍याच्या भंडारआळीमध्ये राहणारा वैभव राऊतच्या घरावर छापा टाकत हातबॉम्ब आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्‍त केले. त्यापाठोपाठ याच परिसरातून शरद कळसकर आणि पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर या दोघांना अटक केली. चौघांच्याही चौकशीतून त्यांच्या संपर्कात असलेल्या आणखी काही कट्टर हिंदूवादी संघटनांतील तरुणांची नावे समोर आली. त्यात अविनाश पवार याचे नाव होते. याप्रकरणातील ही पाचवी अटक आहे.  विशेष म्हणजे यातील कळसकर व गोंधळेकर या दोघांचा कॉ. गोविंद पानसरे, दाभोलकर हत्येशी थेट संबंध असल्याचे तपशील समोर आल्याने अविनाश पवारच्या अटकेचे गांभीर्य वाढले आहे. 

घाटकोपरच्या भटवाडीतील एक मजली चाळीतील घरामध्ये अविनाश पवार आईसोबत राहातो. नऊ वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याजागी तो माझगाव डॉकमध्ये नोकरीला लागला. कट्टर हिंदुत्ववादी असलेला पवार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निस्सीम भक्त आहे. रायगडावर शिवज्योत नेण्यात तो अगे्रेसर असायचा. सनातनसोबतच अन्य हिंदूवादी संघटनानाही तो मानतो. एटीएसने अटक केलेल्या वैभव राऊत, शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर यांच्या संपर्कात तो दोन वर्षांपूर्वी आला. पवार याने नुकतेच पंतनगरमध्ये एक नवीन घर विकत घेतले होते, अशी माहिती मिळते.

माझगाव डॉकमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास पोहचलेल्या एटीएसच्या पथकाने पवारला ताब्यात घेतल्यानंतर डॉकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पवारला सोबत घेऊन एटीएसचे पथक त्याच्या घाटकोपर, भटवाडीमधील घरी पोहचल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांसह, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींनाही धक्का बसला. आपला भाऊ अशाप्रकारचे कृत्य करणे शक्यच नसल्याचे त्याचा चूलत भाऊ गणेश पवार याने पुढारीला सांगितले.