Mon, Aug 19, 2019 18:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महापौरांच्या पोलीस आयुक्त भेटीमुळे शिवसैनिक नाराज

महापौरांच्या पोलीस आयुक्त भेटीमुळे शिवसैनिक नाराज

Published On: Dec 29 2017 1:46AM | Last Updated: Dec 29 2017 1:31AM

बुकमार्क करा
मुंबई  : प्रतिनिधी 

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याने शिवसैनिकच नाही तर विरोधी पक्षांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईच्या प्रथम नागरिकाने पोलीस आयुक्तांची भेट घेणे राजशिष्टाचाराला धरून नाही. पोलीस आयुक्तांना आपल्या कार्यालयात बोलावून संयुक्त बैठक घेण्याचा महापौरांना पूर्ण अधिकार असल्याच्या प्रतिक्रिया शिवसैनिक, माजी महापौर व विरोधी पक्षांमध्ये उमटत आहेत.

मुंबईच्या महापौरांना शहरातच नाही तर, सातासमुद्रापार मानसन्मान दिला जातो. आजही लंडनचा महापौरच नाही तर, देशविदेशी शहारातील महापौर मुंबईच्या महापौरांना भेटण्यास उत्सुक असतात. एकवेळ मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही तरी चालेल, पण मुंबईच्या महापौरांची भेट घेतली जाते. पुर्वी महापौरांच्या अखत्यारित मुंबई पोलीस खाते येत होते. एवढेच नाही तर, मुंबईत एखादा शासकीय कार्यक्रम असला की, महापौरांना राजशिष्टाचारानुसार सर्वोच्च स्थान दिले जात होते. हे स्थान कालांतराने राज्य सरकारने कमी केले. पण आजही राष्ट्रपती व पंतप्रधान एवढेच नाही तर अन्य देशाचे राष्ट्राध्यक्ष मुंबईत येणार असतील तर, राजशिष्टाचारानुसार महापौरांना विमानतळावर स्वागतासाठी जावे लागते. पण बुधवारी महापौरांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेऊन महापौर पदाचे महत्व कमी केले आहे. 

मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर महाडेश्वर यांनी आपल्या पदाचे महत्व कमी केल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी व्यक्त केली. महापौर पालिका आयुक्तांना आपल्या दालनात बोलवू शकतात, तसे मुंबईच्या एखाद्या प्रश्नाबाबत पोलीस आयुक्त व पालिका आयुक्तांची आपल्या दालनात संयुक्त बैठक लावू शकतात, असे मतही राजा यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, महापौरांनी पोलीस आयुक्तांची घेतलेली भेट एक शिवसैनिक म्हणून मनाला पटली नाही. आम्ही महापौरांचा आदर करतो महापौर हे पद मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचे पद आहे. त्यामुळे महापौरांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन निवेदन देणे महापौर पदाला साजेसे नाही, अशी प्रतिक्रिया जितेंद्र जानावळे या शिवसैनिकांने व्यक्त केली. तर काही शिवसैनिकांनी महापौरांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.